मुंबई:आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील 28 व्या सामनात सनरायझर्स हैदराबाद संघाने पंजाब किंग्जवर 7 विकेट्सने विजय मिळवला आहे. हा सामना डीवाय पाटील स्टेडियमवर मुंबई येथे पार पडला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पंजाब किंग्जने लियाम लिव्हिंगस्टोनच्या ( Liam Livingstone ) 60 धावांच्या जोरावर सनरायझर्स हैदराबादला 152 धावांचे लक्ष्य दिले होते. हे आव्हान हैदराबादने 18.5 षटकांत 3 गडी गमावत ( Sunrisers Hyderabad won by 7 wkts ) पूर्ण केले.
पंजाब किंग्जन 151 धावा केल्या होत्या. त्यामुळे सनरायझर्स हैदराबादला ( Sunrisers Hyderabad ) 152 धावांचे लक्ष्य मिळाले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना हैदराबादची सुरुवात खराब झाली. सलामवीर केन विल्यमसन (3) हा पहिल्या विकेट्सच्या रुपाने 3.1 षटकांत बाद झाला. त्यानंतर या संघाला दुसरा धक्का राहुल त्रिपाठीच्या रुपाने बसला तो संघाची 62 धावसंख्या असताना 8.2 षटकांत 34 धावा काढून बाद झाला. त्याच्यानंतर अभिषेक शर्मा 31 धावांवर तंबूत परतला.
दरम्यान एडन मारक्रमने आणि निकोलस पूरनने आणखी पडझड होणार नाही याची काळजी घेतली. या दोघांनी पंजाब संघाच्या ( Punjab Kings ) गोलंदाजांचा समाचार घेताना 75 धावांची नाबाद भागीदारी करुन आपल्या संघाचा डाव सावरला. यामध्ये एडन मारक्रमने ( Aiden Markram ) 27 चेंडूत 4 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने नाबाद 41 धावा केल्या. त्याचबरोबर निकोलस पूरनने ( Nicholas Pooran ) त्याला योग्य साथ देताना 30 चेंडूत 1 चौकार आणि 1 षटकारांच्या मदतीने नाबाद 35 धावा केल्या. तसेच या दोघांनी 18.5 षटकांत 152 धावा करत संघाला विजय मिळवून दिला. पंजाब किंग्ज संघाकडून गोलंदाजी करताना राहुल चहरने सर्वाधिक विकेट्स घेतल्या. त्याने चार षटकांत 28 धावा देताना दोन विकेट्स घेतल्या. त्याचबरोबर कगिसो रबाडाने 29 धावा देताना 1 विकेट घेतली.