मुंबई:इंडियन प्रीमियर लीगच्या पंधराव्या हंगामातील 60 वा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध पंजाब किंग्ज ( Royal Challengers Bangalore vs Punjab Kings ) संघात खेळला जाणार आहे. या सामन्याला शुक्रवारी (12 मे) संध्याकाळी साडेसातला ब्रेबॉर्न स्टेडियवर सुरुवात होणार आहे. दोन्ही संघाच्या दृष्टीने हा सामना जिंकणे खुप महत्वाचे आहे. ज्यामुळे दोन्ही संघाचे प्लेऑफचे भवितव्य ठरणार आहे.
रॉयल चॅलेंजर्सं बंगळुरु संघ ( RCB Team ) 12 पैकी 7 सामने जिंकून गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आहे आणि प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी त्यांना फक्त दोन विजय आवश्यक आहे. दुसरीकडे, पंजाब किंग्जने 11 पैकी 5 सामने जिंकले असून ते आठव्या स्थानावर आहेत आणि त्यांना प्लेऑफमध्ये जाण्यासाठी सर्व सामने जिंकावे लागतील.
विराट कोहली ( Virat Kohli out of form ) वगळता आरसीबीचे सर्व फलंदाज उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहेत. रजत पाटीदार आणि महिपाल लोमरोर देखील कर्णधार फाफ डू प्लेसिस, ग्लेन मॅक्सवेल आणि दिनेश कार्तिक यांच्याप्रमाणे चांगली कामगिरी करत आहेत. कोहलीचा आतापर्यंतचा आयपीएल हंगाम चांगला गेला नाही, परंतु तो पंजाबविरुद्ध त्याची भरपाई करण्याचा प्रयत्न करेल. आरसीबीचे गोलंदाजही सातत्यपूर्ण कामगिरी करत आहेत, ज्यात फॉर्मात असलेला जोश हेझलवूड आणि विश्वसनीय हर्षल पटेल यांचा समावेश आहे. मोहम्मद सिराज त्याच्या सर्वोत्तम फॉर्ममध्ये नाही. पण महत्त्वाच्या प्रसंगी त्याच्याकडून चांगली कामगिरी करण्याची अपेक्षा संघ करू शकतो.
पंजाब किंग्ज संघासाठी ( Punjab Kings Team ) शिखर धवन आणि भानुका राजपक्षे हे आघाडीच्या फळीत चांगले योगदान देत आहेत, तर लियाम लिव्हिंगस्टोन आणि जितेश शर्मा डावाचा शेवट चांगला करत आहेत. जॉनी बेअरस्टोचे फॉर्ममध्ये पुनरागमन ही पंजाबसाठी आनंदाची बातमी आहे. कर्णधार मयंक अग्रवालने मधल्या फळीत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे, परंतु त्याला आघाडीकडून नेतृत्व करणे आवश्यक आहे.