मुंबई:शुक्रवारी आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील 68 वा सामना राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज ( Rajasthan Royals vs Chennai Super Kings ) संघात होणार आहे. हा सामना ब्रेबॉर्न स्टेडियवर संध्याकाळी साडेसातला सुरु होणार आहे. या हंगामातील दोन्ही संघातील हा दुसरा सामना आहे. पहिल्या सामन्यात राजस्थाने धोनीच्या बलाढ्य चेन्नईला धूळ चारली होता. तसेच आजचा सामना राजस्थान रॉयल्स संघासाठी महत्वाचा आहे, तर चेन्नई संघासाठी औपचारिकता असणार आहे.
संजू सॅमसनच्या ( Captain Sanju Samson ) नेतृत्वाखाली राजस्थानने चांगली कामगिरी केली असून संघाने 13 सामन्यात 16 गुण मिळवले आहेत. त्यामुळे संघ हा आपला वेग कायम ठेऊन टॉप 2 मध्ये स्थान मिळवण्यासाठी प्रयत्न करेल. शिमरॉन हेटमायर देखील या महत्त्वपूर्ण सामन्यापूर्वी परतला आहे, जो संघासाठी मोठी ताकद आहे. मात्र, आघाडीच्या फळीतील जोस बटलर आणि यशस्वी जैस्वाल यांना गेल्या काही सामन्यांत चांगली सुरुवात करता आलेली नाही. त्याचबरोबर कर्णधार संजू सॅमसनलाही मोठी खेळी करता आलेली नाही. अर्थात संघाला यात सुधारणा करायला आवडेल. त्याचबरोबर गोलंदाजीतही संघ अतिशय संतुलित असून, त्यांच्या कामगिरीची पुनरावृत्ती करण्याची जबाबदारी त्यांच्यावर असेल.
गेल्या मोसमात विजेतेपद पटकावणाऱ्या चेन्नई सुपर किंग्जला ( Chennai Super Kings team ) यावेळी त्यांच्या कामगिरीची पुनरावृत्ती करता आली नाही. संघाची फलंदाजी आणि गोलंदाजी एकसंध कामगिरी करू शकली नाही. त्यामुळेच चेन्नईने 13 सामन्यांत केवळ चार सामने जिंकले आहेत. अंतिम सामन्यात, चेन्नईला एक युनिट म्हणून कामगिरी करायची आहे आणि त्यांच्या चाहत्यांना थोडा आनंद साजरा करण्याची संधी द्यायची आहे. राजवर्धन हंगरगेकरला आतापर्यंत एकाही सामन्यात संधी मिळालेली नाही आणि अखेरच्या सामन्यात या युवा अष्टपैलू खेळाडूला आपले कौशल्य दाखवण्याची संधी नक्कीच मिळेल, अशी अपेक्षा आहे.