मुूंबई: आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील तिसरा सामना पंजाब किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु ( Punjab Kings vs Royal Challengers Bangalore ) संघात पार पडला. या सामन्यात पंजाब संघाने बंगळुरुवर पाच विकेट्सने शानदार विजय मिळवला आहे. या सामन्यात आरसीबीने प्रथम फलंदाजी करताना 2 बाद 205 धावा केल्या होत्या. याला प्रत्युत्तर देताना पंजाब संघाने हे लक्ष्य 19 षटकांत 5 गडी गमावून 208 धावा करत पूर्ण केली.
पंजाब किंग्जचा कर्णधार मयंक अग्रवालने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. फाफ डु प्लेसिस ( Faf du Plessis ) आणि अनुज रावत यांनी आरसीबीला 50 धावांची चांगली सुरुवात करून दिली आणि पॉवरप्लेमध्ये दोघांनी 41 धावा जोडल्या. मात्र, सातव्या षटकात राहुल चहरने अनुज रावत (21) याला बाद करून संघाला पहिले यश मिळवून दिले. यानंतर फाफ डू प्लेसिसने विराट कोहलीसोबत वेगवान भागीदारी करत 13व्या षटकात संघाला 100 च्या पुढे नेले.
फाफ डू प्लेसिसने संथ सुरुवातीनंतर वेग पकडला आणि 41 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. 16व्या षटकात त्याने कोहलीसह संघाला 150 च्या पुढे नेले आणि दुसऱ्या विकेटसाठी 100 धावांची भागीदारीही पूर्ण केली. फाफ डू प्लेसिसने 57 चेंडूत 88 धावांची धडाकेबाज खेळी केली आणि 18 व्या षटकात अर्शदीप सिंगने त्याला 168 धावांवर बाद केले. येथून दिनेश कार्तिकने 14 चेंडूत 32 धावांची धडाकेबाज खेळी करत संघाला 200 च्या पुढे नेले. विराट कोहली 29 चेंडूत 41 धावा करत नाबाद राहिला. पंजाब किंग्जकडून अर्शदीप सिंग आणि राहुल चहरने प्रत्येकी एक विकेट घेतली.