हैदराबाद : आयपीएल 2022 ( IPL 2022 ) च्या पर्वाला 26 मार्च पासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेचा अंतिम सामना 29 मे ला पार पडणार आहे. त्यामुळे या स्पर्धेत सहभागी असलेल्या 10 संघांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. ज्यामध्ये काही संघानी आपल्या संघासाठी नवीन कर्णधार नियुक्त केले आहेत. ज्यामध्ये आता पंजाब किंग्ज संघाचा ( Punjab Kings Team ) देखील समावेश आहे.
आयपीएल 2022 च्या स्पर्धेत पंजाब किंग्ज हा संघ मयंक अग्रवालच्या ( Punjab Kings are led by Mayank Agarwal ) नेतृत्वाखाली खेळताना दिसून येणार आहे. याबाबतची अधिकृत घोषणा पंजाब किंग्ज संघाने आपल्या ट्विटर हँडलवरुन केली आहे. या अगोदर पंजाब किंग्ज संघाची धुरा केएल राहुल सांभाळत होता. परंतु यंदा तो नव्याने सहभागी झालेल्या लखनऊ सुपरजायंट्स संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे.
या अगोदर आयपीएल स्पर्धेत मयंक अग्रवालने कोणत्याही संघाचे नेतृत्व केले नाही. तसेच यापूर्वी त्याचे कर्णधार होणे जवळपास निश्चित झाले होते. मेगा लिलावापूर्वी पंजाब संघाने केवळ दोन खेळाडूंना कायम ठेवले होते. मयंक अग्रवाल हा पहिला खेळाडू होता, ज्याला फ्रेंचायझीने रिटेन केले होते. त्याच्याशिवाय अनकॅप्ड वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला ( Fast bowler Arshdeep Singh ) कायम ठेवण्यात आले आहे. यानंतर मयंकचे कर्णधारपद जवळपास निश्चित झाले होते.