मुंबई: कोलकाता नाईट राडर्स विरुद्ध पंजाब किंग्स ( KKR vs PBKS ) संघात आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील आठवा सामना खेळला गेला. वानखेडे मैदानावर खेळल्या गेलेल्या सामन्यात कोलकाता संघाने 6 विकेट्सने विजय मिळवला. या विजयात आंद्रे रसेलने नाबाद 70 धावांचे महत्वपूर्ण योगदान दिले. पंजाबने प्रथम फलंदाजी करताना संघाने बी राजपक्साच्या 31 आणि रबाडाच्या 25 धावांच्या जोरावर 18.2 षटकात सर्वबाद 137 धावा केल्या होत्या. त्यामुळे कोलकाता संघाला विजयसाठी 138 धावांचे लक्ष्य मिळाले आहे. या धावांचा पाठलाग करताना कोलकाता संघाने 14.3 षटकांत 4 गडी गमावून 141 धावा करत पूर्ण केले.
138 धावांचा पाठलाग करायला उतरलेल्या कोलकाता संघाला पहिला धक्का सलामीवीर अजिंक्य रहाणेच्या रुपाने बसला. अजिंक्य रहाणेने 11 चेंडूंचा सामना करताना तीन चौकाराच्या मदतीने 12 धावा केल्या. त्याचबरोबर त्याने या 12 धावा करताना आपल्या आयपीएल कारकिर्दीतील चार हजार धावांचा टप्पा पार केला आहे. तो आयपीएल स्पर्धेत चार हजार धावा करणारा 12 वा खेळाडू ठरला आहे. त्याने हा कारनामा फक्त 144 डावांमध्ये केला आहे.
दरम्यान दुसरा सलामीवीर व्यंकटेश अय्यर (3), श्रेयस अय्यर (26) आणि नितेश राणा (0) जलद बाद झाले. त्यामुळे कोलकाता संघाची धावसंख्या 6 षटकानंतर 4 बाद 51 झाली. आंद्रे रसेल आणि सॅम बिलिंग्सने पाचव्या विकेट्साठी नाबाद 90 धावांची भागीदारी केली. ज्यामध्ये आंद्रे रसेलने 70 आणि सॅम बिलिंग्सने 24 धावांची नाबाद खेळी केली. पंजाबकडून राहुल चहरने सर्वाधिक दोन विकेट्स घेतल्या. तसेच रबाडा आणि स्मिथने प्रत्येकी एक विकेट्स घेतली.