मुंबई:कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध पंजाब किंग्स ( Kolkata Knight Riders vs Punjab Kings ) संघात आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील आठवा सामना शुक्रवारी खेळला जाणार आहे. हा सामना वानखेडे मैदानावर संध्याकाळी साडेसात वाजता सुरु होणार आहे. या सामन्यात पंजाब किंग्सचा संघ मंयक अग्रवालच्या नेतृत्वाखाली उतरणार आहे. त्याचबरोबर कोलकाता नाईट रायडर्स संघ श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली खेळताना दिसणार आहे. हा सामना पंजाबचा दुसरा, तर कोलकाता संघाचा तिसरा सामना आहे.
सामन्यात नाणेफेकीचा कौल महत्वाचा -पंजाब किंग्जने विजयाने आपल्या मोहिमेची सुरुवात केली असून संघाला त्यांच्या गोलंदाजांकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असेल. कारण पहिल्याच सामन्यात त्याला 200 हून अधिक धावांनी दिल्या होत्या. दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कागिसो रबाडा ( Bowler Kagiso Rabada ) तीन दिवसांच्या क्वारंटार्ईननंतर खेळण्याची अपेक्षा आहे, ज्यामुळे पंजाबच्या गोलंदाजी आक्रमणाला चालना मिळेल. वानखेडेच्या खेळपट्टीवर केवळ दोनच सामने झाले असून ते पाहता फलंदाजी सोपी राहिलेली नाही, असे दिसते. दोन महिन्यांहून अधिक काळ चालणाऱ्या आयपीएलसाठी आताच सुरुवात झाली आहे, पण नाणेफेक आधीच सामन्याच्या निकालात महत्त्वाची भूमिका बजावत आहे. कारण सामन्याच्या दुसऱ्या डावात दवांचा प्रभाव पडत आहे.
राणाने सातत्यपूर्ण कामगिरी करणे महत्त्वाचे -कोलकाताचा सलामीवीर अजिंक्य रहाणे आणि आक्रमक व्यंकटेश अय्यर हे आरसीबीविरुद्ध स्वस्तात बाद झाले होते. त्यामुळे आता हे दोघेही संघाला दमदार सुरुवात करण्याचा प्रयत्न करतील. कर्णधार श्रेयस अय्यर ( Captain Shreyas Iyer ) आरसीबीविरुद्ध अपयशी ठरला असला, तरी तो चांगल्या फॉर्ममध्ये आहे आणि तो संघासाठी महत्त्वाचा खेळाडू आहे. पण त्याला नितीश राणांसारख्या इतर सहकार्यांची साथ लागेल. डावखुरा फलंदाज नितेश राणाला सातत्यपूर्ण कामगिरी करणे महत्त्वाचे ठरणार आहे. या दोघांशिवाय मधल्या फळीची जबाबदारी सॅम बिलिंग्ज, शेल्डन जॅक्सन आणि बिग हिटर आंद्रे रसेल यांच्या खांद्यावर असेल. केकेआरच्या मधल्या फळीमध्ये असे फलंदाज आहेत, जे कोणत्याही आक्रमणाला कलाटणी देऊ शकतात. संघ व्यवस्थापनाला आशा आहे की, ते सर्व पंजाबविरुद्ध एकजुटीने कामगिरी करतील. गोलंदाजीबद्दल बोलायचे झाले तर, वेगवान गोलंदाज उमेश यादवने दोन्ही सामन्यांमध्ये नवीन चेंडूसह चमकदार कामगिरी केली. न्यूझीलंडचा अनुभवी गोलंदाज टीम साऊदीलाही महत्त्वाची भूमिका बजावावी लागणार आहे.