मुंंबई: इंडियन प्रीमियर लीगच्या पंधराव्या हंगामातील 42 वा सामना गुरुवारी कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स ( Delhi Capitals vs Kolkata Knight Riders ) संघात वानखेडे स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने कोलकाता नाईट रायडर्स संघावर चार विकेट्सने विजय मिळवला. हा कोलकाता संघाचा सलग पाचवा पराभव ठरला. या सामन्यात प्रथम पलंदाजी करताना कोलकाता संघाने 9 बाद 146 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात दिल्लीने 6 बाद 150 धावा करत विजय संपादन केला. यानंतर केकेआर संघाचा कर्णधार श्रेयस अय्यरने प्रतिक्रिया ( Captain Shreyas Iyer reaction ) दिली आहे.
पराभवामुळे निराश झालेल्या श्रेयस अय्यरने सामन्यानंतर सांगितले की, "आम्ही खूप संथ सुरुवात केली आणि काही विकेट्सही गमावल्या. सुरुवातीला चेंडू थोडासा थांबून येत होता, पण तरीही मला विश्वास आहे की या विकेटवर एकूण धावसंख्या जास्त होती आणि होय, आम्ही पहिल्या हाफमध्ये ज्या प्रकारे खेळलो त्याबद्दल कोणतेही कारण देऊ शकत नाही. आम्ही कुठे चुकलो आहोत हे शोधण्यासाठी पुन्हा मागे जावे लागेल."
केकेआर आपली सलामीची जोडी वेळोवेळी बदलत आहे. याबद्दल बोलताना केकेआरचा कर्णधार म्हणाला, “गेले काही सामने खूप कठीण गेले. कारण आम्ही योग्य सलामीची जोडी सेट करू शकलो नाही. काही खेळाडू जखमी झाले आणि संघात काही बदल झाले. स्थिर फलंदाजी आणि गोलंदाजी लाइनअप असणे खूप कठीण आहे. जेव्हा तुम्ही या लीगमध्ये खेळता तेव्हा तुमच्याकडे पहिल्याच सामन्यापासून योग्य संयोजन असणे आवश्यक आहे. तुम्ही गेलात तर तिथून घेऊन जाऊ शकता.''