मुंबई: गुरुवारी आयपीएल 2022 मधील 67 वा सामना गुजरात टायटन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( Gujarat Titans vs Royal Challengers Bangalore ) संघात खेळला गेला. या सामन्यात आरसीबीने गुजरातवर 8 विकेट्सने मात केली. त्याचबरोबर यानंतर गुजरात टायटन्सचा आघाडीचा यष्टीरक्षक फलंदाज मॅथ्यू वेडवर कारवाई ( Action on Matthew Wade ) करण्यात आली आहे. सामन्यादरम्यान वेडने बाद झाल्यानंतर राग व्यक्त केला होता. त्याने रागाच्या भरात ड्रेसिंग रूममध्ये गेल्यावर आपले हेल्मेट आणि बॅट जमिनीवर आपटले आणि त्यामुळेच आयपीएलच्या अधिकाऱ्यांनी त्याच्यावर कारवाई केली आहे.
आरसीबीसाठी ग्लेन मॅक्सवेलने डावातील सहावे षटक घेऊन आला होता, तेव्हा दुसरा चेंडू वेडच्या पायावर जाऊन लागला. ज्यामुळे पंचांनी त्याला बाद घोषित केले. त्यानंतर त्यांनी तातडीने डीआरएस घेण्याचे ठरवले. मात्र, चेंडू त्याच्या बॅटला किंवा ग्लोव्हजला स्पर्श करत नव्हता आणि विकेटही रेषेच्या बाहेर होती. चेंडू विकेटवर (स्टंम्पवर) आदळत होता आणि अंपायरच्या कॉलच्या आधारे त्याला बाद देण्यात आले. वेडने वैयक्तिक 16 धावा केल्या होत्या.
आऊट झाल्यानंतर तो निराश दिसला आणि त्याने हेल्मेट ड्रेसिंग रूममध्ये फेकले. यानंतर त्याने तीन ते चार वेळा इकडे तिकडे बॅट मारली. हे दृश्य कॅमेऱ्यात कैद झाले असून त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पंचांच्या निर्णयाने वेड नाराज झाला.