मुंबई : आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील 34 वा सामना राजस्थान रॉयल्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स ( Rajasthan Royals vs Delhi Capitals ) संघात खेळला जाणार आहे. हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर शुक्रवारी संध्याकाळी साडेसातला सुरु होईल. हा सामना अगोदर पुण्याच्या एमसीए क्रिकेट मैदानावर खेळला जाणार होता. परंतु दिल्ली कॅपिटल्स संघात कोरोनाचा शिरकाव झाल्याने हा सामना मुंबईला हलवण्यात आला. दोन्ही संघातील यंदाच्या हंगामातील हा पहिलाच सामना आहे.
राजस्थान रॉयल्स संघाने ( Rajasthan Royals Team ) आतापर्यंत या हंगामात सहा सामने खेळले आहेत, त्यापैकी चार सामन्यात विजय आणि दोन सामन्यात पराभव स्वीकारला आहे. त्यामुळे संघाचे आठ गुण असून हा संघ गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी आहे. दुसरीकडे दिल्ली कॅपिटल्सने ( Delhi Capitals Team ) देखील सहा सामने खेळले असून तीन विजय आणि तीन पराभव नोंदवले आहेत. त्यामुळे या संघाच्या खात्यात सहा गुण आहेत. म्हणून हा संघ गुणतालिकेत सहाव्या स्थानी आहे. तसेच दोन्ही संघानी देखील आपल्या मागील सामन्यात शानदार विजय मिळवला आहे. ज्यामध्ये दिल्लीने पंजाबचा तर राजस्थानने कोलकात्याचा पराभव करत विजय संपादन केले आहेत.
राजस्थान रॉयल्स संघाच्या कामगिरीबद्दल बोलायचे तर, या संघातील खेळाडूंनी दोन्ही विभागात शानदार प्रदर्शन केले आहे. जोस बटलरची ( Jose Butler ) बॅट सध्या आग ओकत आहे. त्याचबरोबर युझवेंद्र चहलच्या ( Yuzvendra Chahal ) फिरकीसमोर विरोधी संघातील फलंदाज हतबल दिसत आहेत. तेच चित्र दिल्ली कॅपिटल्स संघाचे आहे, कारण कुलदीप यादव सातत्याने आपल्या संघासाठी विकेट्स घेत आहे. त्याचबरोबर डेव्हिड वार्नर ( David Warner ) देखील प्रत्येक सामन्यात आपल्या खेळीत सातत्य ठेवून आहे. त्यामुळे या दोन संघात नक्कीच काट्याची टक्कर होईल यात शंकाच नाही.
दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स संघातील हेड टू हेड -
1. आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात आतापर्यंत एकूण 24 सामने झाले आहेत, त्यापैकी डीसीने 12 आणि आरआरने 12 वेळा विजय मिळवला आहे.
2. दिल्ली कॅपिटल्ससाठी कर्णधार ऋषभ पंतने राजस्थानविरुद्ध सर्वाधिक 300 धावा केल्या आहेत.