मुंबई:आयपीएल 2022 मधील 50 व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने सनरायझर्स हैदराबादचा 21 धावांनी पराभव केला. डेव्हिड वार्नरने ( David Warner ) नाबाद 92 धावांची खेळी केली. या खेळीद्वारे त्याने अनेक विक्रम तर केलेच, पण आपल्या जुन्या संघाकडून एक प्रकारचा बदलाही घेतला. डेव्हिड वॉर्नरने या खेळीने ख्रिस गेलचा मोठा विक्रम मोडला. डेव्हिड वॉर्नरने 58 चेंडूंचा सामना करत 12 चौकार आणि तीन षटकार ठोकले. तो पाचव्या शतकाच्या जवळ होता पण शेवटच्या षटकात त्याने आपल्या कारनाम्यांपेक्षा संघाच्या धावांना महत्त्व दिले.
डेव्हिड वॉर्नरने मोडला गेलचा विक्रम -डेव्हिड वॉर्नरने 92 धावांच्या खेळीद्वारे टी-20 क्रिकेटमधील 89 वे अर्धशतक झळकावले. यासह तो टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक अर्धशतक ( Most fifties in T20 cricket ) ठोकणारा फलंदाज ठरला. त्याने वेस्ट इंडिजच्या ख्रिस गेलचा विक्रम मोडला. टी-20 क्रिकेटमध्ये गेलने 88 अर्धशतके झळकावली होती आणि तो अव्वल स्थानावर होता. आता गेल दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. भारताचा माजी कर्णधार विराट कोहली 76 अर्धशतकांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे.