पुणे: आयपीएलच्या ( IPL 2022 ) पंधराव्या हंगामातील 29 वा सामना गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज ( Gujarat Titans vs Chennai Super Kings ) संघात खेळला जात आहे. हा सामना पुणे येथील एमसीए क्रिकेट मैदानावर खेळला जातोय. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना चेन्नई सुपर किंग्ज संघाने निर्धारित 20 षटकांत 5 बाद 169 धावा केल्या आहेत. त्याचबरोबर गुजरात टायटन्स संघाला 170 धावांचे लक्ष्य दिले आहे.
चेन्नई सुपर किंग्जची ( Chennai Super Kings ) सुरुवात चांगली झाली नाही आणि पॉवरप्लेमध्ये त्यांनी दोन विकेट गमावल्या आणि 6 षटकांनंतर स्कोअर 39/2 झाला. तिसऱ्या षटकात रॉबिन उथप्पा (3) 7 आणि सहाव्या षटकात मोईन अली (1) 32 धावांवर बाद झाला. येथून ऋतुराज गायकवाडने अंबाती रायडूच्या साथीने संघाची धुरा सांभाळली आणि धावसंख्या 12 षटकांत 100 पर्यंत पोहोचवली. ऋतुराज गायकवाडने 37 चेंडूत मोसमातील पहिले अर्धशतक ठोकले. अंबाती रायुडूनेही 31 चेंडूत 46 धावांची सुरेख खेळी केली आणि ऋतुराजसोबत तिसऱ्या विकेटसाठी 92 धावा जोडल्या, पण 15 व्या षटकात 124 धावांवर तो बाद झाल्याने संघाला तिसरा धक्का बसला.