चेन्नई - आयपीएल २०२१ मध्ये शनिवारी मुंबई इंडियन्स संघाने सनरायजर्स हैदराबाद संघाचा १३ धावांनी पराभव केला. या सामन्यात मुंबई इंडियन्सने कमी धावसंख्येचा बचाव करत विजय मिळवला. मुंबईच्या या विजयात योगदान देणाऱ्या जसप्रीत बुमराहचे माजी भारतीय सलामीवीर विरेंद्र सेहवागने कौतुक केले.
एका क्रीडा संकेतस्थळाशी बोलताना सेहवाग म्हणाला, 'जसप्रीत बुमराह हा मुंबई इंडियन्स संघाचा ब्रह्मास्त्र आहे. जोपर्यंत हे ब्रह्मास्त्र मुंबईकडे आहे तोपर्यंत मुंबई अजय राहील.'
दरम्यान, जसप्रीत बुमराहने सनरायजर्सविरुद्धच्या सामन्यात ४ षटकात १४ धावा देत १ गडी बाद केला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना मुंबई इंडियन्सने २० षटकात ५ गडी गमावून १५० अशी धावसंख्या उभारली होती. यात क्वींटन डी कॉक (४०) रोहित शर्मा (३२) आणि केरॉन पोलार्डने नाबाद ३५ धावांचे योगदान दिले.