दुबई - राजस्थान रॉयल्स संघाला आयपीएल 2021 च्या प्ले ऑफ फेरीच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी आज सनरायझर्स हैदराबाद संघाचा पराभव करावा लागणार आहे. यासाठी कर्णधार संजू सॅमसनला मोठी खेळी करावी लागणार आहे. राजस्थानचा संघ 9 सामन्यात 8 गुणांची कमाई केली आहे. तर दुसरीकडे हैदराबादच्या संघाला 9 पैकी फक्त एका सामन्यात विजय मिळवला आला आहे. ते प्ले ऑफ फेरीच्या शर्यतीतून बाहेर गेले आहेत.
यूएईमध्ये आयपीएल 2021 चे दुसरे सत्र खेळवण्यात येत असून यात राजस्थान रॉयल्स संघाने पंजाब किंग्स विरूद्धच्या सामन्यात अवघ्या 2 धावांनी विजय मिळवला. यानंतर त्यांना पुढील सामन्यात दिल्ली कॅपिटल्सकडून 33 धावांनी पराभव पत्कारावा लागला. दुसरीकडे हैदराबादने दुसऱ्या सत्रातील दोन्ही सामने गमावले आहेत. त्यांना दिल्लीने त्यानंतर पंजाबने पराभूत केले. राजस्थानचा संघ हैदराबाद विरुद्ध विजय मिळवण्याची संधी सोडू इच्छिणार नाही. भारतात झालेल्या पहिल्या सत्रात राजस्थानने हैदराबादचा 55 धावांनी पराभव केला होता.
युवा यशस्वी जैस्वाल आणि महिपाल लोमरोर यांनी पंजाबविरुद्धच्या सामन्यात चांगली कामगिरी केली होती. पण ते दिल्लीविरुद्धच्या सामन्यात अपयशी ठरले. या सामन्यात संजू सॅमसनने नाबाद 70 धावांची खेळी केली. लियाम लिविंगस्टोन आणि डेविड मिलर मोठी खेळी करण्यात अपयशी ठरले आहेत. हीच गत रियान पराग आणि राहुल तेवतियाची आहे. पण गोलंदाजीत मुस्तफिजूर रहमान, कार्तिक त्यागी आणि चेतन साकारिया या तिकडीने चांगला मारा केला आहे. याशिवाय दक्षिण आफ्रिकेचा तबरेज शम्सी आणि तेवतियाने फिरकीत चांगले योगदान दिलं आहे.
दुसरीकडे हैदराबाद संघाची कामगिरी निराशजनक राहिली आहे. त्यांचे ना गोलंदाजा लयीत आहेत ना फलंदाज. लीगच्या पहिल्या सत्रात जॉनी बेअयस्टोने सर्वाधिक धावा केल्या होत्या. पण त्याने दुसऱ्या सत्रातून माघार घेतली आहे. डेविड वॉर्नर आउट ऑफ फॉर्म आहे. केन विल्यमसन, मनिष पांडे, रिद्धमान साहा, केदार जाधव यांना मोठी खेळी करता आलेली नाहीये. पण अब्दुल समद झटपट धावा करण्यात यशस्वी ठरला आहे. हैदराबादच्या गोलंदाजीची मदार राशिद खान याच्यावर अवलंबून आहे. कारण भुवनेश्वर कुमार, खलील अहमद यांना आपली छाप सोडला आलेली नाही. पण जेसन होल्डरने अष्टपैलू कामगिरी नोंदवली आहे.