नवी दिल्ली - चेन्नईने सनराइजर्स हैदराबादवर विजय मिळवला आहे. त्यामुळे, आता आयपीएल गुणतालिकेत चेन्नई संघाने अव्वल स्थानावर आले आहे. चेन्नईचा हा पाचवा विजय आहे. हैदराबादने चेन्नईसमोर विजयासाठी १७२ धावांचे लक्ष्य ठेवले होत. हे लक्ष्य चेन्नईच्या फलंदाजांनी सहज गाठले. ऋतुराज गायकवाड आणि फाफ डु प्लेसिस या जोडीने चांगली सुरुवात केली, त्यामुळे विजय सोपा झाला. ऋतुराज आणि फाफ या दोघांनी अर्धशतके झळकावली.
हेही वाचा -भारतातील बायो बबल वातावरण आतापर्यंतचे सर्वाधिक असुरक्षित - झम्पा
डेव्हिड वॉर्नर, मनीष पांडे यांची वैयक्तिक अर्धशतके आणि केन विल्यमसनने डेथ ओव्हरमध्ये केलेली फटकेबाजी याच्या जोरावर सनरायजर्स हैदराबाद संघाने चेन्नई सुपर किंग्ज संघासमोर विजयासाठी १७२ धावांचे आव्हान ठेवले आहे. दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियममध्ये रंगलेल्या या सामन्यात हैदराबादने निर्धारित २० षटकात ३ बाद १७१ धावा केल्या आहेत.
चेन्नई विरुद्धच्या सामन्यात हैदराबादने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. तेव्हा बेयरस्टो आणि डेव्हिड वॉर्नर या जोडीने सावध खेळ केला. मात्र सॅम कुरेनच्या गोलंदाजीवर उंच फटका मारण्याच्या नादात बेयरस्टो ७ धावा करून बाद झाला. सीमारेषेवर दीपक चाहरने त्याचा झेल घेतला. त्यानंतर वॉर्नर-मनीष पांडे जोडीने दुसऱ्या गड्यासाठी शतकी भागिदारी केली. या दरम्यान दोघांनी वैयक्तिक अर्धशतक पूर्ण केले.
डेव्हिड वॉर्नरचा अडथळा लुंगी एनगिडीने दूर केला. वॉर्नरने ५५ चेंडूत ३ चौकार २ षटकारांसह ५७ धावा केल्या. वॉर्नरचा झेल रविंद्र जडेजाने घेतला. यानंतर लुंगी एनगिडीला उंच फटका मारण्याच्या नादात पांडे बाद झाला. त्याने ४६ चेंडूत ५ चौकार आणि १ षटकारासह ६१ धावांची खेळी केली.
पांडे बाद झाल्यानंतर केन विल्यमसनने डावाची सूत्रे हाती घेत फटकेबाजी केली. त्याला केदार जाधवने चांगली साथ दिली. विल्यमसनने १० चेंडूत ४ चौकार आणि १ षटकारासह नाबाद २६ धावा केल्या. तर जाधव ४ चेंडूत १ चौकार आणि १ षटकारासह १२ धावांवर नाबाद राहिला. चेन्नईकडून एनगिडीने सर्वाधिक दोन गडी बाद केले. तर सॅम कुरेनने एक विकेट घेतली.
हेही वाचा -IPL २०२१ : मोहम्मद सिराज नवा यॉर्कर 'किंग', पाहा जबराट व्हिडिओ