दुबई -संजू सॅमसनच्या तुफानी खेळीच्या जोरावर राजस्थान रॉयल्स संघाने सनरायझर्स संघासमोर विजयासाठी 165 धावांचे लक्ष्य ठेवले. मात्र जेसन रॉयचे आक्रमक अर्धशतक आणि केन विल्यमसनची संयमी खेळीच्या जोरावर सनरायझर्स हैदराबादने राजस्थान रॉयल्सवर ७ गड्यांनी मात दिली. राजस्थानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 5 बाद 164 धावा केल्या. यात सॅमसनने 82 धावांची खेळी केली.
राजस्थान रॉयल्स संघाचा कर्णधार संजू सॅमसन याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तेव्हा यशस्वी जैस्वाल आणि इविन लेविस ही जोडी सलामीला उतरली. यशस्वी आणि लेविस जोडीने संदीप शर्माला पहिल्या षटकात दोन चौकार मारत 11 धावा वसूल केल्या. यानंतर पुढील षटकात भुवनेश्वर कुमारने लेविसला बाद करत राजस्थानला पहिला धक्का दिला. लेविसने 4 चेंडूत 6 धावांचे योगदान दिले. त्याचा झेल अब्दुल समदने घेतला.
लेविस बाद झाल्यानंतर कर्णधार संजू सॅमसन मैदानात उतरला. संजू-यशस्वी जोडीने अर्धशतकी भागिदारी केली. तेव्हा संदीप शर्माने यशस्वी जैस्वालला क्लिन बोल्ड करत ही जोडी फोडली. यशस्वीने 23 चेंडूत 5 चौकार आणि 1 षटकारासह 36 धावांची खेळी केली. यानंतर आलेला लियाम लिविंगस्टोन फारसा कमाल दाखवू शकला नाही. त्याला राशिद खानने आपल्या फिरकी जाळ्यात अडकवले. 4 धावांवर अब्दुल समदने त्याचा झेल घेतला.