मुंबई -रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने राजस्थान रॉयल्स संघाचा १० गडी राखून पराभव केला आणि गुणतालिकेत अव्वलस्थान काबीज केले. राजस्थानने बंगळुरूपुढे विजयासाठी १७८ धावांचे लक्ष्य ठेवले होते. राजस्थानचे हे आव्हान बंगळुरू संघाने १६.३ षटकात बिनबाद पूर्ण केले. सलामीवीर देवदत्त पडीक्कलने ५२ चेंडूत नाबाद (१०१) शतक झळकावले. यात ११ चौकार आणि ६ षटकारांच्या समावेश आहे. कर्णधार विराट कोहलीने ४७ चेंडूत ६ चौकार आणि ३ षटकारासंह नाबाद ७२ धावांची खेळी केली. बंगळुरूचा स्पर्धेतील हा सलग चौथा विजय ठरला.
तत्पूर्वी, बंगळुरूने नाणेफेक जिंकून राजस्थानला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. तेव्हा राजस्थानची सुरूवात खराब झाली. मोहम्मद सिराजने जोस बटलर (८) क्लिन बोल्ड करत राजस्थानला पहिला हादरा दिला. त्यानंतर कायले जेमिसनच्या गोलंदाजीवर ऊंच फटका मारण्याच्या नादात मनन वोहरा (७) बाद झाला. त्याचा झेल केन रिचर्डसनने टिपला. सिराजने डेव्हिड मिलरला शून्यावर पायचित करत राजस्थानला बॅकफूटवर ढककले. राजस्थानची अवस्था ४.३ षटकात ३ बाद १८ अशी झाली. तेव्हा संजू सॅमसनवर संघाची भिस्त होती. मात्र तोही कमाल करु शकला नाही. संजू सॅमसन १८ चेंडूत २१ धावा करून बाद झाला. सुंदरच्या गोलंदाजीवर फटका मारण्याच्या नादात तो ग्लेन मॅक्सवेलच्या हाती झेल देऊन बसला.