चेन्नई -आयपीएलच्या चौदाव्या पर्वामध्ये आज डबल हेडरमधील पहिला सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने जिंकला. बंगळुरूने ग्लेन मॅक्सवेल आणि एबी डिव्हिलियर्स यांच्या तुफानी खेळीच्या जोरावर कोलकातापुढे विजयासाठी २०५ धावांचे तगडे आव्हान ठेवले होते. प्रत्युत्तरादाखल कोलकाताचा संघाला २० षटकात ८ बाद १६६ धावांपर्यंत मजल मारता आली. बंगळुरू हा सामना ३८ धावांनी जिंकला. या विजयासह बंगळुरूने विजयाची हॅट्ट्रिक साधत गुणतालिकेत अव्वलस्थान काबीज केले.
बंगळुरूने दिलेल्या २०५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना सलामीवीर शुबमन गिलने आक्रमक सुरूवात केली. पण त्याला मोठी खेळी करता आली नाही. त्याने ९ चेंडूत २ चौकार आणि २ षटकारांसह २१ धावा केल्या. यानंतर राहुल त्रिपाठी (२५), नितीश राणा (१८), दिनेश कार्तिक (२), इयॉन मॉर्गन (२९) ठराविक अंतराने बाद झाले. तेव्हा आंद्रे रसेल आणि शाकिब अल हसन या जोडीने फटकेबाजी करत सामन्यात परतण्याचा प्रयत्न केला. शाकिब (२६) बाद झाल्यानंतर पॅट कमिन्सदेखील एक षटकार ठोकून बाद झाला. आंद्रे रसेल अखेरच्या षटकात बाद झाला. त्याने ३१ धावांची खेळी केली. यात ३ चौकार २ षटकारांचा समावेश आहे.
तत्पूर्वी, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या बंगळुरू संघाला वरुण चक्रवर्तीने डावाच्या दुसऱ्या षटकात दोन धक्के दिले. त्याने प्रथम विराट कोहलीला चकवलं. मोठा फटका मारण्याच्या नादात उ़डालेला विराटचा (५) झेल राहुल त्रिपाठीने टिपला. यानंतर अखेरच्या चेंडूवर चक्रवर्तीने रजत पाटीदार (१) याचा त्रिफाळा उडवला. यानंतर देवदत्त पडीक्कल आणि मॅक्सवेल या जोडीने बंगलुरूचा डाव सावरला. दोघांनी तिसऱ्या गड्यासाठी ८६ धावांची भागिदारी केली. यादरम्यान, मॅक्सवेलने आयपीएलच्या चौदाव्या हंगामात सलग दुसरे अर्धशतक पूर्ण केले.
प्रसिद्ध कृष्णाच्या चेंडूवर मोठा फटका मारण्याच्या नादात पडीक्कल (२५) बाद झाला. त्याचा झेल त्रिपाठीने सीमारेषेवर टिपला. पडीक्कल बाद झाल्यानंतर आलेल्या एबी डिव्हिलियर्सने मॅक्सवेलसह तुफानी फटकेबाजी केली. दोघांनी कोलकाताच्या गोलंदाजीचा खरपूस समाचार घेतला. दोघांनी चौथ्या गड्यासाठी ३५ चेंडूत ५३ धावांची भागिदारी रचली. १७व्या षटकातील अखेरच्या चेंडूवर मॅक्सवेल पॅट कमिन्सच्या चेंडूवर बाद झाला. त्याने ४९ चेंडूत ९ चौकार आणि ३ षटकारांसह ७८ धावांची खेळी केली.
मॅक्सवेल बाद झाल्यानंतर डिव्हिलियर्सने मोर्चा सांभाळला. त्याने रसेलने फेकलेल्या १८व्या षटकात एक षटकार आणि दोन चौकारासह १७ धावा वसूल केल्या. हरभजनच्या पुढच्या षटकात जेमिसन आणि डिव्हिलियर्स या दोघांनी दोन षटकार आणि एका चौकारासह १८ धावा चोपल्या. डिव्हिलियर्सने ३४ चेंडूत नाबाद ७६ धावा केल्या. यात ९ चौकार आणि ३ षटकारांचा समावेश आहे. जेमिसन ११ धावांवर नाबाद राहिला. या दोघांनी पाचव्या गड्यासाठी १८ चेंडूत ५६ धावांची भागिदारी केली. कोलकाताकडून चक्रवर्तीने २ तर कमिन्स आणि कृष्णा यांनी प्रत्येकी १-१ गडी बाद केला.