चेन्नई - आयपीएलच्या १४व्या हंगामात सहावा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यात बुधवारी पार पडला. या सामन्यात बंगळुरूने हैदराबादला ६ धावांनी पराभूत केले. ग्लेन मॅक्सवेल आणि शाहबाज अहमद हे बंगळुरूच्या विजयाचे शिल्पकार ठरले. ग्लेन मॅक्सवेलच्या ५९ धावांच्या खेळीच्या जोरावर बंगळुरूने २० षटकात ८ विकेट १४९ धावा केल्या. त्यानंतर शाहबाज अहमदने कमाल गोलंदाजी केली. त्याने १७ व्या षटकात ३ गडी बाद करत सामन्याचे रुप पालटलं आणि सामना बंगळुरूच्या बाजूने झुकवला.
हैदराबादचा संघ १६व्या षटकापर्यंत सुस्थितीत होता. १६व्या षटकानंतर अडीच मिनिटाचा टाईम आऊट घेण्यात आला. त्यानंतर विराट कोहलीने शाहबाज अहमदला १७व्या षटकात गोलंदाजीसाठी बोलवले. शाहबाजने आपल्या कर्णधाराला निराश केलं नाही. त्याने टाकलेले षटक सामन्याचे टर्निंग पॉईट ठरला. शाहबाजने या षटकात धोकादायक जॉनी बेयरस्टो, मनीष पांडे आणि अब्दुल समद यांना बाद केलं. त्याने पहल्या, दुसऱ्या आणि शेवटच्या चेंडूवर विकेट मिळवली.
२६ वर्षाच्या शाहबाजने या सामन्यात २ षटकात ७ धावा देऊन ३ महत्वपूर्ण विकेट घेतल्या. शाहबाजला मोहम्मद सिराज आणि हर्षल पटेलने चांगली साथ दिली. या दोघांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. सिराजने रिद्धीमान साहा आणि जेसन होल्डरला बाद केलं. तर हर्षल पटेलने विजय शंकर आणि शाहबाज नदीमला माघारी धाडले.