दुबई - गतविजेता मुंबई इंडियन्स संघाचा पराभव केल्यानंतर आत्मविश्वास वाढलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा आज बुधवारी राजस्थान रॉयल्स संघाची सामना होणार आहे. आरसीबी या सामन्यात विजयी लय कामय राखण्याचा प्रयत्न करेल. विराट कोहलीच्या आरसीबी संघाने 10 सामन्यात 12 गुणांची कमाई केली असून ते प्ले ऑफ फेरीच्या जवळ आहेत. आज त्यांनी जर राजस्थानचा पराभव केला. त्यांचे प्ले ऑफ फेरीतील जागा जवळपास निश्चित होईल. दुसरीकडे राजस्थानच्या संघाने 10 सामन्यात 8 गुणांची कमाई केली आहे. त्यांच्यासाठी आजचा सामना 'करो या मरो' स्थितीतील आहे. राजस्थानचा आजच्या सामन्यात पराभव झाला तर त्यांची प्ले ऑफ फेरीची वाट खडतर होईल.
आयपीएल 2021 च्या दुसऱ्या सत्रात आरसीबीची सुरूवात खराब झाली. कोलकाता नाइट रायडर्स त्यानंतर चेन्नई सुपर किंग्सने त्यांचा पराभव केला. या पराभवानंतर आरसीबीने मुंबई इंडियन्स संघाचा पराभव करत विजयी लय पकडली. हीच लय कायम राखण्याचा निर्धार आरसीबीचा असेल. विराट कोहलीने मागील दोन सामन्यात सलग दोन अर्धशतके झळकावली आहे. दुसरीकडे ए बी डिव्हिलियर्स धावा करताना संघर्ष करताना पाहायला मिळत आहे. त्याने मागील तीन सामन्यात 0, 12, 11 अशा धावा केल्या आहेत. त्याच्याकडून आजच्या सामन्यात मोठ्या खेळीची आशा आरसीबी संघाची असणार आहे. ग्लेन मॅक्सवेल तुफान फॉर्मात आहे. त्याने मागील सामन्यात 37 चेंडूत 56 धावांची खेळी केली होती. गोलंदाजीत हर्षल पटेलने मागील सामन्यात हॅट्ट्रिक घेतली होती. त्याने मागील तीन सामन्यात 6 गडी बाद केले आहेत. याशिवाय युझवेंद्र चहलने देखील 5 गडी बाद केले आहे. न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज कायले जेमीसनची दोन सामन्यात विकेटची पाटी रिकामी आहे.