शारजाह -ग्लेन मॅक्सवेल तुफानी अर्धशतकी खेळीच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने पंजाब किंग्ससमोर विजयासाठी 165 धावांचे आव्हान ठेवले आहे. बंगळुरूने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेत 20 षटकात 7 बाद 164 धावा केल्या आहेत. मॅक्सवेलने 33 चेंडूत 57 धावांची खेळी साकारली. यात 3 चौकार आणि 4 षटकारांचा समावेश आहे. पंजाबकडून हेनरिक्स आणि शमीने प्रत्येकी 3-3 गडी बाद केले.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर बंगळुरूची सलामीवीर जोडी विराट कोहली आणि देवदत्त पडीक्कल मैदानात आले. त्यांनी सावध खेळ केला. दोघांनी 9.4 षटकात 68 धावांची सलामी दिली. हेनरिक्सने बंगळुरूला एकपाठोपाठ तीन सलग धक्क दिले.
हेनरिक्सने 10व्या षटकातील चौथ्या चेंडूवर विराट कोहलीला क्लिन बोल्ड केले. विराटने 24 चेंडूत 2 चौकार आणि 1 षटकारांसह 25 धावा केल्या. यानंतर पुढील चेंडूवर हेनरिक्सने डॅनियल ख्रिश्चिनची शिकार केली. त्याचा झेल सर्फराज खानने घेतला. त्याला भोपळाही फोडता आला नाही. 12व्या षटकात हेनरिक्सने देवदत्त पडीक्कल याला बाद केले. पडीक्कलने 38 चेंडूत 4 चौकार आणि 2 षटकारासह 40 धावांचे योगदान दिले.