शारजाह - आयपीएल 2021 मध्ये आज 48वा सामना खेळला जात आहे. सुपर संडेच्या डबल हेडरमधील पहिल्या सामन्यात विराट कोहलीचा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ आणि के एल राहुलचा पंजाब किंग्स संघ आमने-सामने झाला आहे. या सामन्यात बंगळुरूने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. पंजाबसाठी आजचा सामना करो किंवा मरो या स्थितीतील आहे. प्ले ऑफ फेरीतील आव्हान कायम राखण्यासाठी त्यांना आजच्या सामना विजय मिळवावा लागणार आहे.
बंगळुरू-पंजाब संघातील बदल
बंगळुरूने आपला मागील सामन्यातील संघ कायम ठेवला आहे. तर दुसरीकडे पंजाबने आपल्या संघात तीन बदल केले आहेत. पंजाबने फॅबियन एलेन, दीपक हुड्डा आणि नॅथन एलिसला संघाबाहेर केले आहे. त्यांच्या जागेवर सर्फराज खान, हरप्रीत बरार आणि मोयसेस हेनरिक्सला अंतिम संघात स्थान दिले आहे.
शारजाहमध्ये बंगळुरू आणि पंजाबची कामगिरी
दोन्ही संघाने या हंगामामध्ये शारजाहच्या मैदानावर प्रत्येकी 1-1 सामने खेळला आहे. यात बंगळुरूच्या संघाचा पराभव झाला होता. तर पंजाबने 125 धावांचे आव्हानाचा बचाव करताना 5 धावांनी विजय मिळवला होता.
गुणतालिकेतील स्थिती -
दोन्ही संघाबाबत सांगायचे झाल्यास बंगळुरूचा संघ सुस्थितीत आहे. बंगळुरूने 11 पैकी 7 सामने जिंकली आहेत. त्याच्या खात्यात 14 गुण असून ते गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे. दुसरीकडे पंजाबचा संघाने 12 पैकी 5 सामन्यात विजय मिळवला असून त्याच्या खात्यात 10 गुण आहेत. ते गुणतालिकेत 5 व्या स्थानी आहेत.