मुंबई -राजस्थान रॉयल्सने कोलकाता नाईट रायडर्सवर 6 विकेट्सने विजय मिळवला आहे. कोलकाताने राजस्थानला विजयासाठी 134 धावांचे आव्हान दिले होते. हे आव्हान राजस्थानने 18.5 षटकात 4 विकेट्स गमावून पूर्ण केले आहे. यामध्ये सर्वात जास्त 42 धावा संजू सॅमसनने केल्या आहे. तर डेविड मीलरने 24 धावा केल्या. यशस्वी जैस्वाल आणि शीवम दुबे यांनी प्रत्येकी 22 धावा केल्या.
राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. तेव्हा नितीश राणा आणि शुबमन गिल यांनी कोलकाताच्या डावाची सुरुवात केली. पॉवर प्लेच्या शेवटच्या षटकात चोरटी धाव घेताना शुबमन (११) धावबाद झाला. पॉवर प्लेमध्ये कोलकाताने १ बाद २५ धावा फलकावर लावल्या. पॉवर प्लेनंतरच्या ब्रेकनंतर नितीश राणाही (२२) माघारी परतला. वेगवान गोलंदाज चेतन साकारियाने त्याला यष्टीपाठी झेलबाद केले. त्यानंतर आलेला सुनील नरेनही (६) स्वस्तात बाद झाला.
जयदेव उनाडकटने नरेनला १०व्या षटकात माघारी धाडले. यशस्वी जैस्वालने त्याचा सुरेख झेल टिपला. नरेननंतर आलेला कर्णधार इयॉन मॉर्गन धावबाद झाला. मॉरिसच्या षटकात धाव घेताना त्रिपाठी आणि मॉर्गन याच्यात गडबड झाली आणि मॉर्गन धावबाद झाला. त्याला भोपळाही फोडता आला नाही. राहुल त्रिपाठीने ३६ धावांचे योगदान देत संघाची धावगती वाढवली. पण १६व्या षटकात मुस्तफिजूरने त्याला बाद केले.
आंद्रे रसेल डेथ ओव्हरमध्ये कमाल करणार का? याची उत्सुकता होती. पण तो देखील एक षटकार मारल्यानंतर (९) बाद झाला. ख्रिस मॉरिसने त्याला मिलरकडे झेल देण्यास भाग पाडले. त्यानंतर दिनेश कार्तिकही (२५) बाद झाला. मॉरिसच्या गोलंदाजीवर सकारियाने त्याचा झेल टिपला. यानंतर अखेरच्या षटकात पॅट कमिन्स (१०) झेलबाद झाला. त्याचा झेल रियान परागने सीमारेषेवर टिपला. राजस्थानकडून ख्रिस मॉरिसने सर्वाधिक ३ गडी बाद केले. तर जयदेव उनाडकट, सकारिया, मुस्तफिजूर यांनी प्रत्येकी १-१ गडी टिपला.