मुंबई - आयपीएलच्या चौदाव्या हंगामातील सातवा सामना दोन युवा कर्णधारांमध्ये होत आहे. दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स आज मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये आमने-सामने होतील. एकीकडे आहे ऋषभ तर दुसरीकडे आहे संजू सॅमसन. दिल्लीने पहिला सामना जिंकला आहे. तर राजस्थानचा सलामीच्या सामन्यात पराभव झालेला आहे.
दिल्ली संघाने चेन्नई सुपर किंग्जचा ७ गडी राखून पराभव करत स्पर्धेची सुरूवात केली आहे. तर दुसरीकडे सोमवारी पंजाब किंग्सच्या २२२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना राजस्थानला चार धावांनी पराभव पत्करावा लागला होता. ६३ चेंडूत ११९ धावांची खेळी करणाऱ्या सॅमसनला अखेरच्या चेंडूवर पाच धावा काढता आल्या नाहीत.
बेन स्टोक्स स्पर्धेतून बाहेर -
राजस्थानचा स्फोटक खेळाडू बेन स्टोक्स हा बोटाच्या दुखण्यामुळे आयपीएलबाहेर पडला आहे. यामुळे जोस बटलर, शिवम दुबे आणि रियान पराग यांच्यावर दडपण वाढणार आहे. हे सर्वजण मोठी खेळी करण्यात अपयशी ठरले. सलामी सामन्यात गोलंदाजदेखील ढेपाळले. चेतन सकारियाचा अपवाद वगळता पंजाबच्या फलंदाजांवर कुणीही वर्चस्व गाजवू शकले नव्हते. त्यामुळे गोलंदाजी सुधारण्याचे आव्हान राजस्थानपुढे असणार आहे.
दिल्लीची सलामी जोडी फॉर्मात -
दिल्लीचे सलामीवीर शिखर धवन व पृथ्वी शॉ हे शानदार फॉर्ममध्ये आहेत. चेन्नईविरुद्धच्या सलामीच्या सामन्यात ख्रिस वोक्स, आवेश खान यांनी प्रभावी कामगिरी केली. दुसरीकडे रविचंद्रन अश्विन, टॉम कुरेन, अमित मिश्रा व मार्क्स स्टोयनिस यांनी निराश केले आहे. त्यांना आजच्या सामन्यात चांगली कामगिरी नोंदवावी लागणार आहे.