मुंबई - देशात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. यामुळे आरोग्य यंत्रणा तोडकी पडत आहे. या महामारीच्या विरोधातील लढ्यासाठी अनेक दानशूर व्यक्ती मदतीचा हात पुढे करत आहेत. यात आयपीएलमधील संघ राजस्थान रॉयल्सची भर पडली आहे. राजस्थानने ७.५ करोड रुपयांची मदत जाहीर केली आहे.
राजस्थान रॉयल्स यांनी ट्विट करत मदत जाहीर केली आहे. त्यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की, 'राजस्थान रॉयल्स संघाचे मालक, खेळाडू आणि संघव्यवस्थापनाने कोरोना बाधितांच्या मदतीसाठी १ मिलियन डॉलर (७.५ करोड) मदत करण्याचा निर्णय घेतला आहे.'
भारतात कोरोनाशी मुकाबला करणाऱ्या लोकांसाठी राजस्थान रॉयल्सकडून ही मदत जाहीर करण्यात आली आहे. खेळाडू, संघ मालक आणि संघ व्यवस्थापक यांनी पुढाकार घेऊन हा निधी गोळा करण्यात आला आहे आणि राजस्थान रॉयल्स फिलांथ्रोपिक आणि राजस्थान रॉयल्स फाऊंडेशन यांनी ब्रिटिश एशियन ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने हा पुढाकार घेतला आहे. ब्रिटिश एशियन ट्रस्ट ही भारत सरकारसोबत विविध प्रकल्पात काम करत आहेत, असेही राजस्थानने म्हटलं आहे.