अहमदाबाद -कोलकाता नाईट रायडर्सच्या अचूक आणि भेदक गोलंदाजीसमोर राहुल आणि कंपनीने शरणागती पत्कारली. आयपीएल २०२१ आज कोलकाता नाईट रायडर्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये सामना रंगला आहे. या सामन्यात पंजाब किंग्जने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ९ बाद १२३ धावा केल्या आहेत. कोलकाताला विजयासाठी १२४ धावांचे आव्हान मिळाले आहे.
नाणेफेक गमावल्यानंतर पंजाब किंग्जचा संघ प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरला. मयांक अग्रवाल आणि केएल राहुल या दोघांनी ३६ धावांची सलामी दिली. पॅट कमिन्सच्या गोलंदाजीवर राहुल झेलबाद झाला. त्याने २ चौकार आणि १ षटकारासह १९ धावा केल्या. राहुलचा झेल नरेन याने टिपला. त्यानंतर आलेल्या ख्रिस गेलला भोपळाही फोडता आला नाही. शिवम मावीने त्याला कार्तिकडे झेल देण्यास भाग पाडले.
दीपक हुडा (१) देखील स्वस्तात बाद झाला. त्याला प्रसिद्ध कृष्णाने मॉर्गनकरवी झेलबाद केले. मयांक अग्रवालने दुसरी बाजू लावून धरली होती. पण त्याचा अडथळा नरेन याने दूर केला. मयांकने ३१ धावा केल्या. यात २ षटकार आणि १ चौकाराचा सामावेश आहे. मयांकचा झेल त्रिपाठीने घेतला. मयांकनंतर हेनरिक्स (२) आणि निकोलस पूरन (१९) बाद झाले.