अहमदाबाद - आयपीएलच्या चौदाव्या हंगामामध्ये आज साखळी फेरीतील २१वा सामना पंजाब किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात होणार आहे. हा सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार असून या हंगामात या मैदानावर होणारा हा पहिलाच सामना आहे.
पंजाब किंग्जने मागील सामन्यात गतविजेत्या मुंबई इंडियन्सचा पराभव केला आहे. त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास दुणावला आहे. दुसरीकडे कोलकाता नाईट रायडर्सला सलग चार पराभव स्वीकारावे लागले आहेत. कोलकाता कोणत्याही परिस्थितीत आजच्या सामन्यात विजय मिळवण्याचा प्रयत्न करेल. तर पंजाब विजयी लय कायम ठेवण्याच्या निर्धाराने मैदानात उतरेल.
पंजाब संघाच्या फलंदाजीची मदार राहुल, मयांक अगरवाल आणि ख्रिस गेल या आघाडीच्या फलंदाजांवर आहे. या तिघांव्यतिरिक्त शाहरुख खान हाणामारीच्या षटकांत फटकेबाजी करण्यात पटाईत आहे. मुंबईविरुद्धच्या सामन्यात गोलंदाजांनी टिच्चून मारा केला. यामुळे पंजाबची गाडी हळूहळू रुळावर येत आहे. फिरकीपटू रवी बिश्नोईचा समावेश त्यांच्यासाठी फलदायी ठरला.
दुसरीकडे युवा फलंदाज शुबमन गिलला स्पर्धेत अद्याप सूर गवसलेला नाही. यामुळे नितीश राणा आणि राहुल त्रिपाठी यांच्यावरील दडपण वाढत आहे. कर्णधार मॉर्गनलाही फलंदाजीत सुधारणा करण्याची गरज आहे. आंद्रे रसेल आणि पॅट कमिन्स उत्तम अष्टपैलू योगदान देत आहेत. मात्र वरुण चक्रवर्ती व्यतिरिक्त अन्य गोलंदाजांना बळी मिळवताना संघर्ष करावा लागत आहे.
पंजाब किंग्सचा संघ -