मुंबई - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघातील खेळाडू अॅडम झम्पा आणि केन रिचर्डसन यांनी वैयक्तिक कारण देत आयपीएलमधून माघार घेऊन ऑस्ट्रेलिया गाठलं आहे. मायदेशी परतल्यानंतर झम्पा यानं, आयपीएलच्या बायो बबल विषयी मोठं विधान केलं आहे.
अॅडम झम्पाने एका माध्यमाला मुलाखत दिली. यात तो म्हणाला, 'आम्ही आतापर्यंत अनेक ठिकाणी बायो बबल वातावरणात खेळलो आणि मला वाटतं की, भारतातील बायो बबलचे वातावरण हे सुरक्षित नाही. आम्हाला भारतात नेहमीच स्वच्छतेबद्दल सांगितलं जात होते आणि अधिकची दक्षता घ्यावी लागत होती.'
सहा महिन्यांपूर्वीच आयपीएल स्पर्धा युएईमध्ये खेळवण्यात आली होती. पण तिथे आम्हाला अजिबात असुरक्षित असे वाटलं नाही. मला तिथे खूप सुरक्षित वाटले. वैयक्तिकरित्या मला वाटते की, आयपीएलसाठी यूएई हा एक चांगला पर्याय ठरला असता, परंतु त्यात बरीच राजकारणाची जोड आहे. यावर्षी टी-२० विश्वकरंडक भारतात होणार आहे. कदाचित क्रिकेट विश्वात पुढील चर्चा यावर असेल, असे देखील झम्पा म्हणाला.