मुंबई -बीसीसीआयने तडकाफडकी निर्णय घेत आयपीएलचा चौदावा हंगाम मध्यातून स्थगित करण्यात आल्याचे जाहीर केले. यामुळे आयपीएल चाहत्यांचा हिरमोड झाला आहे. या विषयावरून समिश्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहे. या दरम्यान, आयपीएल स्पर्धा तात्काळ का स्थगित करण्यात आली, याचे कारण आयपीएल गव्हर्निंग काउंसिलने सांगितलं आहे.
आयपीएल गव्हर्निंग काउंसिलने एक निवेदन प्रसिद्ध केले आहे. यात त्यांनी, आयपीएल आणि बीसीसीआयने तातडीने बैठक घेतली. या बैठकीत आयपीएलचा चौदावा हंगाम तात्काळ स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला. आयपीएलमध्ये सहभागी खेळाडू, सपोर्ट स्टाफ तसेच इतरांच्या सुरक्षेबाबत बीसीसीआय तडजोड करू इच्छित नाही. भागधारकांची सुरक्षा, आरोग्य लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला, असल्याचे सांगितलं आहे.
सद्या खूप कठीण काळ सुरू आहे. खासकरुन भारताला याचा मोठा फटका बसला आहे. या कठीण काळात काही सकारात्मकता आणि आनंद देण्याचा प्रयत्न आम्ही केला. पण आता स्पर्धा स्थगित करणे. याशिवाय प्रत्येकाने आपल्या कुटुंबीयांकडे आणि प्रिय व्यक्तींजवळ जाणं अत्यावश्यक आहे, असे देखील आयपीएल गव्हर्निंग काउंसिलने सांगितलं आहे.
आयपीएल गव्हर्निंग काउंसिलने आयपीएलमधील सर्व सहभागी घटकांचे आभार मानले आहेत. त्यांनी, आयपीएलमध्ये सहभागी झालेल्या सर्वांची सुरक्षितता तसेच त्यांच्या प्रवासाची व्यवस्था करण्याचा बीसीसीआय प्रयत्न करेल. या कठीण परिस्थितीत देखील आयपीएलचे आयोजन करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणाऱ्या सर्व आरोग्य कर्मचारी, राज्य संघटना, खेळाडू, सहाय्यक कर्मचारी, फ्रँचायझी, प्रायोजक, भागीदार आणि सेवा पुरवणाऱ्यांचे बीसीसीआय आभार मानू इच्छित आहे, असेही म्हटले आहे.
दरम्यान, कोलकाता संघातील दोन खेळाडूंना सोमवारी कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. त्यामुळे सोमवारचा कोलकाता विरुद्ध बंगळुरू सामना पुढे ढकलण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला होता. त्यानंतर सोमवारी सायंकाळी चेन्नईच्या संघासोबत असणारे तीन सपोर्ट स्टाफ देखील कोरोना पॉझिटिव्ह आल्यामुळे बीसीसीआयची चिंता वाढली. अखेर खेळाडू आणि त्यांच्यासोबत असणाऱ्या सपोर्ट स्टाफच्या आरोग्याचा विचार करून बीसीसीआयने आयपीएल स्पर्धा तूर्तास स्थगित करण्यात आल्याचे जाहीर केलं.
हेही वाचा -कोरोनाने घेतला आयपीएलचा बळी; उर्वरित सर्व सामने स्थगित
हेही वाचा -IPL पुन्हा कधी सुरू होणार?, बीसीसीआयने दिली 'ही' माहिती