चेन्नई - दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने मंगळवारी झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सवर सहज विजय मिळवला. दिल्लीच्या या विजयाचा फटका चेन्नई सुपर किंग्जला बसला. ते गुणतालिकेत तिसऱ्या क्रमांकावर घसरले आहेत. मुंबई विरुद्ध दिल्ली सामन्यानंतर गुणतालिकेत नेमके काय बदल झाले पाहा...
मुंबईविरुद्धच्या सामन्याआधी दिल्लीचा संघ गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी होता. तर दुसऱ्या स्थानी चेन्नईचा संघ होता. पण दिल्लीने मुंबईवर विजय मिळवत दुसरे स्थान काबीज केले. चेन्नईचा संघ तिसऱ्या स्थानी घसरला आहे. मुंबईच्या संघाने चौथे स्थान कायम राखले आहे. दरम्यान, चेन्नई आणि मुंबई संघाचे समान गुण आहेत परंतु नेट रनरेटच्या जोरावर ते विविध स्थानावर आहेत.
अशी आहे गुणतालिकेची स्थिती -
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ तीन सामन्यातील तीन विजयासह पहिल्या स्थानावर आहे. तर दिल्लीचा संघ चार सामन्यातील तीन विजयासह दुसऱ्या स्थानी आहे. बंगळुरू आणि दिल्ली संघाचे समान ६ गुण आहेत. परंतु ते सरस नेट रनरेटमुळे पहिल्या दुसऱ्या स्थानावर आहेत. तिसऱ्या स्थानी चेन्नईचा संघ आहे. चौथ्या स्थानी मुंबई कायम आहे. पाचव्या, सहाव्या आणि सातव्या स्थानी अनुक्रमे कोलकाता, राजस्थान आणि पंजाबचा संघ आहे. या सर्व संघांनी प्रत्येकी एक सामना जिंकला आहे. तीन पराभवासह हैदराबादचा संघ गुणतालिकेत तळाशी आहे.
हेही वाचा -IPL २०२१ : रोहितवर एका सामन्याच्या बंदीची टांगती तलवार, मुंबईच्या अडचणीत वाढ
हेही वाचा -महेंद्रसिंह धोनीच्या आई-वडिलांना कोरोनाची लागण; रुग्णालयात दाखल