मुंबई - विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने मंगळवारी झालेल्या रोमांचक सामन्यात दिल्ली कॅपिटल्सवर अखेरच्या चेंडूवर फक्त एका धावेने विजय मिळवला. या विजयासह बंगळुरू संघाने गुणतालिकेत महेंद्रसिंह धोनीच्या चेन्नई सुपर किंग्ज संघाला धक्का दिला.
दिल्लीविरुद्धच्या सामन्याआधी बंगळुरूचा संघ गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी होता. चेन्नई संघ पहिल्या स्थानावर विराजमान होता. बंगळुरूने दिल्लीवर विजय मिळवत पहिले स्थान काबीज केले. बंगळुरूचा या हंगामातील हा पाचवा विजय होता. आतापर्यंतच्या सहा सामन्यांमध्ये त्यांनी पाच विजय मिळवले असून त्यांच्या खात्यात १० गुण जमा झाले आहेत.