शारजाह - आयपीएल 2021 मध्ये आज डबल हेडरमधील दुसऱ्या सामन्यात पंजाब किंग्सने सनरायझर्स हैदराबाद संघापुढे विजयासाठी 126 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. एडन मार्करम याने सर्वाधिक 27 धावांचे योगदान दिले. तर हैदराबादकडून जेसन होल्डरने सर्वाधिक 3 गडी बाद केले.
सनरायझर्स हैदराबाद संघाचा कर्णधार केन विल्यमसन याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तेव्हा के एल राहुल आणि मयांक अगरवाल ही जोडी सलामीला मैदानात उतरली. जेसन होल्डरने 5व्या षटकात पंजाबला दोन धक्के दिले. त्याने या षटकातील पहिल्या चेंडूवर के एल राहुलला (21) बाद करत पंजाबला जबर धक्का दिला. यानंतर त्याने अखेरच्या चेंडूवर मयांक अगरवाल (5) याला विल्यमसनकडे देण्यास भाग पाडले.
ख्रिस गेल आणि एडन मार्करम जोडीने पंजाबचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. तेव्हा राशिद खान हैदराबादसाठी धावून आला. त्याने ख्रिस गेलला (14) पायचित केले. तर निकोलस पूरनची (8) शिकार संदिप शर्माने केली. यानंतर अब्दुल समदने मार्करमला (27) मनिष पांडेकडे झेल देण्यास भाग पाडले. तेव्हा पंजाबची अवस्था 14.4 षटकात 5 बाद 88 अशी झाली.