नवी दिल्ली - मुंबई इंडियन्सने आयपीएलच्या चौदाव्या हंगामात तिसरा विजय मिळवला. आज डबल हेडरमधील पहिल्या सामन्यात मुंबईने राजस्थानचा ७ गडी राखून पराभव केला. राजस्थानने प्रथम फलंदाजी करताना विजयासाठी १७२ धावांचे आव्हान मुंबई समोर ठेवले होते. राजस्थानचे हे लक्ष्य मुंबईने १८.३ षटकात तीन गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केले. सलामीवीर क्विंटन डी कॉकने नाबाद ७० धावांची खेळी केली.
राजस्थानने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना रोहित आणि डी कॉक जोडीने ६ षटकात ४९ धावांची सलामी दिली. रोहितचा अडथळा ख्रिस मॉरिसने दूर केला. त्याने १४ धावा केल्या. रोहितचा झेल चेतन सकारियाने टिपला. त्यानंतर डी कॉकने सूर्यकुमार यादवसोबत दुसऱ्या विकेटसाठी भागिदारी केली. पण ख्रिस मॉरिसने सूर्यकुमारला बटलरकडे झेल देण्यास भाग पाडले. त्याने १६ धावा केल्या. डी कॉकने एक बाजू लावून धरत अर्धशतक पूर्ण केले. त्याला कृणाल पांड्याने चांगली साथ दिली.
विजय आवाक्यात आल्यानंतर कृणाल पांड्या फटकेबाजी करण्याच्या नादात बाद झाला. मुस्तीफिजूरने त्याला क्लिन बोल्ड केलं. त्याने २६ चेंडूत २ चौकार आणि २ षटकारांसह ३९ धावांची खेळी केली. त्यानंतर डी कॉक-पोलार्ड या जोडीने मुंबईच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. डी कॉकने ५० चेंडूत ६ चौकार आणि २ षटकारांसह नाबाद ७० धावा केल्या. तर पोलार्ड १६ धावांवर नाबाद राहिला. राजस्थानकडून मॉरिसने २ तर मुस्तफिजूरने एक गडी बाद केला.