दुबई -आयपीएल 2021 च्या दुसऱ्या सत्राला सुरूवात होण्यासाठी काही दिवसांचा कालावधी शिल्लक राहिला आहे. अशात सनरायझर्स हैदराबाद संघाच्या डोकेदुखीत वाढ झाली आहे. हैदराबादचा स्टार फिरकी गोलंदाज मुजीब उर रहमान, वीजाच्या अडचणीमुळे आतापर्यंत संघासोबत जोडला गेलेला नाही. पण हैदराबादचे राशिद खान आणि मोहम्मद नबी हे दुबईत दाखल होत क्वारंटाइन झालेले आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुजीब उर रहमान याच्या वीजासंदर्भात काम केले जात आहे. पण मुजीब संघासोबत कधी जोडला जाईल हे अद्याप सांगता येत नाही.
दरम्यान, हैदराबादचा संघ आयपीएल 2021 च्या दुसऱ्या सत्रात 22 सप्टेंबर रोजी दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध पहिला सामना खेळणार आहे.
कॅरेबियन प्रीमियर लीग आणि दक्षिण आफ्रिका-श्रीलंका यांच्यातील मालिकेत खेळणाऱ्या खेळाडूंसाठी थोडीशी सवलत देण्यात आली आहे. त्या खेळाडूंना 6 दिवसांच्या ऐवजी दोन दिवसांचा क्वारंटाइन बंधनकारक करण्यात आला आहे. यात त्यांची कोरोना चाचणी केली जाणार आहे. त्याचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर खेळाडूंना बायो बबलमध्ये प्रवेश करण्याची परवानगी मिळणार आहे.