मुंबई -आयपीएल २०२१ मध्ये बुधवारी चेन्नई सुपर किंग्ज आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यात सामना पार पडला. चेन्नईने या सामन्यात हैदराबादचा ७ गडी राखून पराभव केला. पण, या सामन्यात चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने सोपा झेल सोडला. धोनीने सोडलेल्या या झेलवरून सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.
सनरायजर्स हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तेव्हा वॉर्नर आणि जॉनी बेयरस्टो या सलामीवीर जोडीने हैदराबादच्या डावाला सुरुवात केली. दुसरीकडे चेन्नईकडून दीपक चहरने पहिले षटक फेकले. चहरच्या षटकामधील दुसऱ्याच चेंडूवर जॉनी बेयरस्टोच्या बॅटची कड घेऊन चेंडू धोनीच्या दिशेने आला. सहज आणि सोपा वाटणारा हा झेल धोनीने सोडल्याचे पाहायला मिळाले. धोनीकडून इतका सोपा झेल मिस होऊ शकतो, हे क्रिकेट चाहत्याला पटण्यापलीकडे होते.
धोनीने दोन्ही हातांनी चेंडू पकडण्याचा प्रयत्न केला. पण त्याला यश आले नाही. धोनीचे नशिब चांगले म्हणून ही चूक चेन्नईला महागात पडली नाही. जॉनी बेयरस्टो अवघ्या ७ धावा करुन माघारी परतला. परंतु बेयरस्टोचा झेल सुटल्यानंतर धोनीकडून हे कस होऊ शकत? असा प्रश्न त्यांच्या चाहत्यांना पडला आहे. धोनी इतका सोपा कॅच सोडू शकतो हे क्रिकेट चाहत्यांना आश्चर्याचा धक्का देणारेच होते.