मुंबई - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा प्रमुख वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज नवा यॉर्कर 'किंग' बनला आहे. दिल्लीविरुद्धच्या सामन्यात सिराजने आपल्या यॉर्कर गोलंदाजीच्या जोरावर बंगळुरू संघाला विजय मिळवून दिला. दिल्लीचा स्फोटक फलंदाज ऋषभ पंत आणि शिमरोन हेटमायर सिराजच्या यॉर्करला पर्याय शोधून शकले नाहीत. परिणामी दिल्लीचा एका धावेने पराभव झाला.
दिल्लीला अखेरच्या षटकात विजयासाठी १४ धावांची गरज होती. पण सिराजने यॉर्कर मारा करत दिल्लीच्या फलंदाजांना मोठे फटके मारण्यापासून लांब ठेवले. सिराज आयपीएलमध्ये गोलंदाजीदरम्यान, जास्ती जास्त यॉर्कर चेंडूचा वापर करत आहे. यामुळे फलंदाजांना त्याच्या गोलंदाजीवर धावा करणे अवघड बनलं आहे.
सिराजने आयपीएलच्या चौदाव्या हंगामाला सुरूवात होण्याआधीच स्पष्ट केलं होतं की, तो या आयपीएलमध्ये यॉर्करचा मारा जास्त करणार आहे. यासाठी त्याने खास तयारी देखील केल्याचे सांगितले. सिराजने आतापर्यंत ६ सामन्यात ६ गडी बाद केले आहेत. या हंगामात त्याने १३८ चेंडू फेकले आहेत. सिराज या आयपीएलमध्ये ५० चेंडू निर्धाव फेकणारा पहिला गोलंदाज आहे.