चेन्नई - मुंबई इंडियन्सचा अष्टपैलू खेळाडू जयंत यादवने दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या पराभवानंतर देखील आपल्या संघाचे कौतूक केले. त्याच्या मते, कमी धावसंख्या असताना देखील मुंबई इंडियन्सने सामना अखेरच्या षटकापर्यंत नेला ही कौतूकास्पद बाब आहे.
सामना संपल्यानंतर जयंत यादवने मुंबई इंडियन्सच्या कामगिरीवर प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला, चेन्नईची खेळपट्टी फलंदाजीसाठी कठीण होती. आम्ही आणखी १० ते १५ धावा करण्यात अपयशी ठरलो. पण आमची जेव्हा गोलंदाजी आली तेव्हा दव पडायला सुरूवात झाली. माझ्या हिशोबाने सामना अखेरच्या षटकापर्यंत घेऊन जाऊन आम्ही चांगली कामगिरी केली.
पॉवर प्लेमध्ये विकेट घेणे आणि धावा रोखणे ही आमची रणणिती होती. मधल्या षटकात आम्ही सामना घालवला. कारण चेंडू ओला झाला होता. अशा चेंडूने देखील आम्ही सामना अखेरच्या षटकापर्यंत नेला ही बाब मोठी आहे. याचे श्रेय आमच्या गोलंदाजांना जात, असे देखील जयंत म्हणाला.
दरम्यान, दिल्लीविरुद्धच्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना मुंबई इंडियन्स संघाने २० षटकात ९ बाद १३७ धावा केल्या. यात रोहित शर्मा (४४), सूर्यकुमार यादव (२४), इशान किशन (२६) व जयंत यादव (२३) यांनी आपले योगदान दिले. पण हार्दिक पांड्या व कृणाल पांड्या हे चुकीचे फटके मारून बाद झाले. यामुळे मुंबईला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. अनुभवी अमित मिश्राने २४ धावांत ४ विकेट्स घेत मुंबईच्या डावाला खिंडार पाडले. त्याला आवेश खानने २ षटकांत १५ धावांत २ विकेट्स घेत चांगली साथ दिली.
मुंबईने दिलेल्या १३८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना शिखर धवन (४५), स्टीव्ह स्मिथ ३३), ललित यावद (नाबाद २२) आणि शिमरोन हेटमायर (नाबाद १४) यांनी त्यांची जबाबदारी चोख पार पाडली. मुंबई इंडियन्सचे ९ बाद १३७ धावांचे आव्हान दिल्लीने १९.१ षटकांत ४ बाद १३८ धावा करून सहज पार पाडले.
हेही वाचा -IPL २०२१ : कोलकात्यासमोर चेन्नईचे आव्हान, धोनी-मॉर्गन आमनेसामने
हेही वाचा -PBKS vs SRH : नाणेफेक जिंकून पंजाबचा प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय