महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

MI Vs KKR : मुंबई इंडियन्सचा कोलकाता नाइट रायडर्सवर १० धावांनी विजय - केकेआर प्लेइंग इलेव्हन

चेन्नईच्या मैदानात धावांचा पाठलाग करणाऱ्या कोलकाता नाईट रायडर्सला रोखत मुंबई इंडियन्सने स्पर्धेतील पहिला विजय मिळवला.

IPL 2021 : Kolkata knight riders vs Mumbai indians match live updates
LIVE MI Vs KKR : नाणेफेक थोड्याच वेळात होणार

By

Published : Apr 13, 2021, 7:02 PM IST

Updated : Apr 14, 2021, 12:38 PM IST

चेन्नईच्या मैदानात धावांचा पाठलाग करणाऱ्या कोलकाता नाईट रायडर्सला रोखत मुंबई इंडियन्सने स्पर्धेतील पहिला विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना मुंबईने सुर्यकुमार यादव ५६ आणि रोहित शर्मा ४३ यांच्या खेळीच्या जोरावर निर्धारित २० षटकात १५२ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना कोलकाता नाईट रायडर्सने दमदार सुरुवात केली. नितीश राणा ५७ आणि शुबमन गिल ३३ यांनी पहिल्या विकेटसाठी ७२ धावांची भागीदारी केली. राहुल चाहरने सेट झालेल्या या दोघांसह राहुल त्रिपाठी ५, इयॉन मॉर्गन ७ धावांवर माघारी धाडले. डेथ ओव्हरमध्ये बुमराह आणि बोल्ट या वेगवान जोडीने अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत कोलकाताच्या संघाला १० धावांनी पराभूत केले.

मुंबईच्या १५२ धावांचा पाठलाग करताना नितीश राणा आणि शुबमन गिलने चांगली सुरुवात केली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी ७२ धावा केल्या. राहुल चाहरने मुंबईला शुभमनच्या रुपात पहिले यश मिळवून दिले. गिलने २४ चेंडूत ३३ धावा केल्या. पहिल्या सामन्यात अर्धशतकी खेळी करणारा राहुल त्रिपाठी अवघ्या ५ धावांवर राहुल चाहरच्या जाळ्यात अडकला. कर्णधार इयॉन मॉर्गनलाही त्याने ७ धावांवर बाद केले. आघाडीचे गड्यांना बाद करत राहुल चाहरने मुंबई इंडियन्सला सामन्यात आणले. कृणाल पांड्याने शाकिब हसनला बाद करुन संघाला आणखी एक दिलासा दिला. दिनेश कार्तिक आणि आंद्रे रसेल संघाला विजय मिळवू देतील, असे वाटत होते. मात्र जसप्रीत बुमराहने अचूक टप्प्यावर केलेला मारा आणि बोल्डने अखेरच्या षटकात रसेल आणि कमिन्सनच्या दांड्या उडवत मुंबई इंडियन्सला विजय मिळवून दिला. कोलकाताचा संघ २० षटकात ७ बाद १४२ धावाच करु शकला.

तत्पूर्वी,नाणेफेक जिंकून कोलकाताने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. मुंबईकडून रोहित शर्मा आणि क्विंटन डी कॉकने डावाची सुरुवात केली. आज मुंबईच्या संघात ख्रिस लीनच्या जागी क्विंटन डिकॉकला संधी देण्यात आली. मुंबईच्या डावाची सुरूवात खराब झाली. क्विंटन डी कॉक केवळ २ धावांवर बाद झाला. चार षटकांनंतर मुंबईची धावसंख्या २८ होती. डी कॉकनंतर मैदानात आलेल्या सूर्यकुमार यादवने ३३ चेंडूत अर्धशतक झळकावले. मुंबईची धावसंख्या १० ओव्हरनंतर ८१ होती. सूर्यकुमार यादव ५६ धावांवर बाद झाला. इशांन किशन केवळ एक धाव काढून माघारी परतला.

मुंबई इंडियन्सने १४ व्या षटकांत १०० धावा पूर्ण केल्या. कोलकाताचा जलदगती गोलंदाज पॅट कमिन्सने कर्णधार रोहित शर्माला तंबूत धाडले. रोहितने ३२ चेंडूत ४३ धावा केल्या. प्रसिद्ध कृष्णाने स्फोटक फलंदाज हार्दिक पांड्याला केवळ १५ धावांवर माघारी पाठवले. केकेआरचा ऑलराउंडर आंद्रे रसेलने डावाच्या १८ व्या षटकात केरॉन पोलार्ड व मार्को जेनसनचे विकेट घेऊन मुंबईच्या मोठी धावसंख्या उभारण्याच्या इच्छांवर पाणी फेरले.

Last Updated : Apr 14, 2021, 12:38 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details