शारजाह - कोलकाता नाइट रायडर्स संघाने दिल्ली कॅपिटल्सचा 3 गडी राखून पराभव करत प्ले-ऑफमधील आपल्या दावेदारीचे आव्हान कायम ठेवले आहे. कोलकाताच्या शिस्तबद्ध गोलंदाजीच्या समोर दिल्लीला 20 षटकात 9 बाद 127 धावांपर्यंत मजल मारता आली. त्यानंतर कोलकाताने दिल्लीचे हे आव्हान 3 गडी आणि 10 चेंडू राखून पूर्ण केले. या विजयासह कोलकाताच्या खात्यात दोन गुणांची भर पडली आहे. कोलकाताचा संघ 10 गुणांसह गुणतालिकेत चौथ्या स्थानावर कायम आहे.
दिल्लीने दिलेल्या 128 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना केकेआरने सावध सुरूवात केली. व्यंकटेश अय्यर आणि शुबमन गिल या जोडीने सावध खेळ केला. पाचव्या षटकात ललित यादवने व्यंकटेश अय्यर क्लीन बोल्ड करत केकेआरला पहिला धक्का दिला. अय्यरने 14 धावांचे योगदान दिले. यानंतर राहुल त्रिपाठीची विकेट अर्शद खान याने घेतली. तर झेल स्टिव्ह स्मिथने घेतला. त्याने 9 धावा केल्या. यानंतर शुबमन गिल आणि नितीश राणा जोडीने एकेरी दुहेरी धाव घेत वाटचाल सुरू केली. तेव्हा कगिसो रबाडाने वैयक्तिक पहिल्या षटकात शुबमन गिलला श्रेयस अय्यरकडे झेल देण्यास भाग पाडले. त्याने 33 चेंडूत 30 धावांचे योगदान दिले. इयॉन मॉर्गन आर. अश्विनच्या फिरकी जाळ्यात अडकला. त्याला अश्विनने भोपळाही फोडू दिला नाही.
केकेआरची अवस्था 11.2 षटकात 4 बाद 67 अशी झाली. तेव्हा नितिश राणा आणि दिनेश कार्तिकने केकेआरच्या डावाला आकार दिला. दोघांनी एकेरी दुहेरी धाव घेत धावफलक हलता ठेवला. 15व्या षटकात अर्शद खानने कार्तिकला क्लीन बोल्ड करत केकेआरला अडचणीत आणले. कार्तिकने 12 धावा केल्या. यानंतर आलेल्या सुनिल नरेनने आक्रमक पावित्रा घेतला. त्याने कगिसो रबाडाने फेकलेल्या 16 व्या षटकात 21 धावा वसूल केल्या. यात त्याने दोन षटकार आणि 1 चौकार खेचला. त्याआधी नितिश राणाने 14व्या षटकात ललित यादवला 20 धावा चोपल्या. यात त्याने दोन षटकार आणि 1 चौकार मारला.