मुंबई - येथील वानखेडे स्टेडियममध्ये बुधवारी खेळवण्यात आलेल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सचा चेन्नई सुपर किंग्ज संघाकडून पराभव झाला. चेन्नईकडून मिळालेल्या पराभवानंतर कोलकात्याचा कर्णधार इयॉन मॉर्गनवर १२ लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
चेन्नई सुपर किंग्जविरुद्धच्या सामन्यामध्ये कोलकाताच्या गोलंदाजांनी संथ गतीने गोलंदाजी केल्याने मॉर्गनला १२ लाखांचा दंड झाला आहे. कोलकाताची या सिझनमधील ही पहिलीच चूक आहे, त्यामुळे फक्त मॉर्गनवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. पण, यापुढे जर अशीच चूक झाली तर मॉर्गनवर एका सामन्याची बंदी येऊ शकते. दरम्यान, मॉर्गनच्या आधी अशी दंडात्मक कारवाई चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा यांच्यावर देखील झाली आहे.
आयपीएलचा नियम काय सांगतो -
आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलच्या नियमानुसार प्रत्येक संघाला ९० मिनिटांत २० षटके पूर्ण करणे भाग आहे. यापूर्वी ९० व्या मिनिटाला २०वे षटक सुरू करावे असा नियम होता, परंतु आता निर्धारित दीड तासाच्या आत २० षटक पूर्ण करावे लागणार आहे. शिवाय या ९० मिनिटांत संघाला अडीच मिनिटांचा दोनदा टाइम आऊटही मिळणार आहे. म्हणजेच प्रत्येक संघांला ८५ मिनिटांत एकूण २० षटके टाकणे अपेक्षित आहे. त्यानुसार प्रत्येक संघाला एका तासामध्ये १४.१ षटके टाकावी लागणार आहेत.