अबुधाबी - अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने कोलकाता नाइट रायडर्सचा 2 गडी राखून पराभव केला. सामन्याच्या 19 व्या षटकात रविंद्र जडेजाने विस्फोटक फलंदाजीचा नजराणा पेश करत सामना चेन्नईच्या बाजूने फिरवला. चेन्नईला अखेरच्या 12 चेंडूत विजयासाठी 26 धावांची गरज होती. तेव्हा जडेजाने प्रसिद्ध कृष्णाने फेकलेल्या 19व्या षटकात 22 धावा कुटल्या. यात 2 षटकार आणि 2 चौकाराचा समावेश आहे. पण अखेरच्या षटकात सुनिल नरेनने सॅम कुरेन आणि रविंद्र जडेजाला बाद करत सामन्यात रंगत आणली. परंतु अखेरच्या चेंडूवर दीपक चहरने विजयी धाव घेतली. केकेआरने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 6 बाद 171 धावा केल्या होत्या. केकेआरचे हे आव्हान चेन्नईने अखेरच्या चेंडूवर पूर्ण केले.
केकेआरने दिलेल्या 172 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या चेन्नई संघाला ऋुतुराज गायकवाड आणि फाफ डू प्लेसिस यांनी चांगली सलामी दिली. दोघांनी 6 षटकात बिनबाद 52 धावा धावफलकावर लावल्या. चेन्नईचा पहिला गडी 76 धावांवर बाद झाला. ऋुतुराज गायकवाड 28 चेंडूत 40 धावा काढून बाद झाला. त्याला आंद्रे रसेलने इयॉन मॉर्गनकडे झेल देण्यास भाग पाडले.
ऋुतुराज गायकवाडनंतर फाफ डू प्लेसिस माघारी परतला. त्याला प्रसिद्ध कृष्णाने बाद केले. डू प्लेसिसने 30 चेंडूत 43 धावांची खेळी केली. यानंतर अंबाटी रायुडू वैयक्तिक 10 धावा काढून बाद झाला. त्याला सुनिल नरेन याने क्लिन बोल्ड केले. रायुडूनंतर आलेल्या मोईन अलीने स्फोटक फलंदाजी केली. त्याला लॉकी फर्ग्यूसन याने बाद केले. त्याने 28 चेडूत 32 धावांची खेळी केली.
चेन्नईला सुरेश रैनाच्या रुपाने पाचवा धक्का बसला. वरुण चक्रवर्तीने त्याला धावबाद केले. त्याने 11 धावांचे योगदान दिले. यानंतर आलेल्या महेंद्र सिंग धोनीची (1) शिकार देखील चक्रवर्ती यानेच केली. धोनीला त्याने क्लिन बोल्ड केले.