मँचेस्टर-दुबई - आयपीएल 2021 चा उर्वरित हंगाम खेळण्यासाठी करार केलेले भारतीय क्रिकेटर चार्टर आणि कमर्शियल फ्लाइटने यूएईला रवाना झाले आहेत. त्याआधी दोन दिवस खेळाडूंची दोन वेळा आरटी-पीसीआर चाचणी करण्यात आली. यात सर्व खेळाडूंचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आणि त्यांचा प्रवासाचा मार्ग मोकळा झाला. दरम्यान, फ्लाइटची व्यवस्था ज्या त्या खेळाडूच्या फ्रेंचायझीने केली.
भारतीय संघाचे ज्यूनियर फिजिओ योगेश पारमार यांना कोरोनाची लागण झाली. यामुळे भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचवा आणि अखेरचा निर्णायक सामना रद्द करण्यात आला. यानंतर खेळाडू आयपीएलचा उर्वरित हंगाम खेळण्यासाठी लवकर निघाले. दरम्यान, आयपीएलच्या उर्वरित हंगामाला 19 सप्टेंबरपासून सुरूवात होत आहे.
बीसीसीआयमधील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने पीटीआयला सांगितलं की, चांगली बातमी ही आहे की, सर्व खेळाडू आणि सपोर्ट स्टाफमधील सदस्यांची दुसरी आरटी-पीसीआर चाचणी निगेटिव्ह आली आहे. रिपोर्ट शुक्रवारी रात्री उशिरा आले. यातील बहुतांश खेळाडू आयपीएलसाठी दुबईला रवाना होण्यासाठी निघाले आहेत.
आयपीएलमध्ये न खेळणारे दोन खेळाडू अभिमन्यू ईश्वरन आणि अर्जन नागवास्वाला यांच्यासह सपोर्ट स्टाफ सोमवारी रवाना होणार आहे. ते दुबईहून भारताकडे प्रयाण करतील, असे देखील त्या अधिकाऱ्याने सांगितलं.