अबुधाबी - आयपीएल 2021 मध्ये आज डबल हेडरमध्ये दोन सामने होणार आहेत. यातील पहिला सामना राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात अबुधाबीच्या शेख झायेद स्टेडियममध्ये रंगला आहे. या सामन्यात दिल्लीने प्रथम फलंदाजी करताना 154 धावा केल्या असून राजस्थानला विजयासाठी 155 धावांचे आव्हान मिळाले आहे. यात श्रेयस अय्यरने सर्वाधिक 43 धावांचे योगदान दिले. तर मुस्तफिजूर रहमान आणि चेतन साकारिया यांनी प्रत्येकी 2-2 गडी बाद केले.
राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसन याने नाणेफेक जिंकून दिल्लीच्या संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. तेव्हा शिखर धवन आणि पृथ्वी शॉ या सलामीवीर जोडीला चांगली सुरूवात करून देण्यात अपयश आले. शिखर धवन (8) कार्तिक त्यागीच्या गोलंदाजीवर क्लीन बोल्ड झाला. या धक्क्यातून सावरत असलेल्या दिल्लीला चेतन सकारियाने पृथ्वी शॉला (8) बाद करत आणखी अडचणीत आणले.
श्रेयस अय्यर आणि ऋषभ पंत या जोडीने तिसऱ्या गड्यासाठी अर्धशतकी भागिदारी करत दिल्लीचा डाव सावरला. संघाची धावसंख्या 83 असताना मुस्तफिजूर रहमान याने पंतला क्लिन बोल्ड केले. त्याने 24 धावांची खेळी केली. पंतपाठोपाठ अय्यर देखील माघारी परतला. त्याला राहुल तेवतियाने सॅमसनकडे झेल देण्यास भाग पाडले. अय्यरने 32 चेंडूत 1 चौकार आणि 2 षटकारांसह 43 धावांची खेळी साकारली.