अबुधाबी - आयपीएल 2021 मध्ये दिल्ली कॅपिटल्स संघाची विजयी घौडदौड कायम आहे. दिल्लीने आज राजस्थान रॉयल्स संघाचा 33 धावांनी पराभव केला. या विजयासह दिल्ली गुणतालिकेत अव्वलस्थानी पोहोचली आहे. तसेच त्यांनी प्ले ऑफ फेरीत आपलं स्थान जवळपास निश्चित केलं आहे. दिल्लीने प्रथम फलंदाजी करताना राजस्थान संघासमोर विजयासाठी 155 धावांचे आव्हान ठेवले होते. परंतु राजस्थानच्या संघाला हे आव्हान पेलावले नाही. त्यांच्या संघाला 20 षटकात 6 बाद 121 धावांपर्यंत मजल मारता आली. कर्णधार संजू सॅमसन याने नाबाद 70 धावांची खेळी करत एकाकी झुंज दिली. पण तो देखील आपल्या संघाचा पराभव टाळू शकला नाही. दिल्लीकडून एनरिक नार्खियाने सर्वाधिक 2 गडी बाद केले. तर आवेश खान, आर. अश्विन, कगिसो रबाडा आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी 1-1 गडी बाद केला.
दिल्लीने दिलेल्या 155 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या राजस्थानची सुरूवात खराब झाली. लियान लिविंगस्टोन (1), यशस्वी जैस्वाल (5) आणि डेविड मिलर (2) स्वस्तात बाद झाले. यामुळे राजस्थानची अवस्था 4.2 षटकात 3 बाद 17 अशी झाली. अशात कगिसो रबाडाने महिपाल लोमरोरला (19) बाद करत राजस्थान संघाला बॅकफूटवर ढकलले. यानंतर रियान परागची (2) शिकार अक्षर पटेलने केली. तेव्हा राजस्थानची अवस्था 11.5 षटकात 5 बाद 55 अशी झाली.
कर्णधार संजू सॅमसनने एक बाजू लावून धरली. त्याला राहुल तेवतियाची साथ मिळाली. दोघांनी सहाव्या गड्यासाठी 44 भागिदारी केली. पण ते धावगती राखण्यास अपयशी ठरले. 18व्या षटकात नार्खियाने तेवतियाला (9) बाद केले. दुसरीकडे सॅमसनने आपले अर्धशतक पूर्ण केले. तो अखेरपर्यंत नाबाद राहिला. त्याने 53 चेंडूत 8 चौकार आणि 1 षटकारासह नाबाद 70 धावांची खेळी केली. पण तो देखील संघाला पराभवापासून वाचवू शकला नाही. राजस्थानच्या संघाला 20 षटकात 6 बाद 121 धावांपर्यंत मजल मारता आली आणि दिल्लीने हा सामना 33 धावांनी जिंकला. नार्खियाने 2 तर आवेश खान, आर. अश्विन, कगिसो रबाडा आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी 1-1 गडी बाद केला.
तत्पूर्वी, राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसन याने नाणेफेक जिंकून दिल्लीच्या संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. तेव्हा शिखर धवन आणि पृथ्वी शॉ या सलामीवीर जोडीला चांगली सुरूवात करून देण्यात अपयश आले. शिखर धवन (8) कार्तिक त्यागीच्या गोलंदाजीवर क्लीन बोल्ड झाला. या धक्क्यातून सावरत असलेल्या दिल्लीला चेतन सकारियाने पृथ्वी शॉला (8) बाद करत आणखी अडचणीत आणले.