मुंबई - आयपीएलच्या चौदाव्या हंगामात आज चेन्नई सुपर किंग्जने रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा ६९ धावांनी पराभव केला. चेन्नईच्या या विजयात अष्टपैलू रविंद्र जडेजाने तिन्ही आघाड्यावर मोलाचे योगदान दिले. एक प्रकारे, एकट्या जडेजानेच बंगळुरूचा पराभव केला. बंगळुरूचा कर्णधार विराट कोहलीने याची कबुली देखीलदिली.
सामना संपल्यानंतर बोलताना विराट म्हणाला, 'या पराभवाकडे सकारात्मक नजरेने पाहण्याची गरज आहे. योग्य वेळी हा पराभव झाला आणि संघात काय नेमके चुकते आहे हे कळाले. ही आमच्यासाठी सकारात्मक बाब आहे. या सामन्यात आम्ही पकड निर्माण केली होती. परंतु दारूण पराभव झाला. रविंद्र जडेजाने त्याच्या कौशल्याच्या जोरावर आमच्याकडून सामना हिसकावून घेतला. त्याने एकट्याने आम्हाला पराभूत केले, असे म्हणू शकता.'
जडेजाने फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही आघाड्यावर दमदार कामगिरी केली. त्याच्या या कामगिरीचा मला आनंद आहे. दोन महिन्यानंतर तो भारतीय संघाकडून खेळताना दिसेल आणि तुमचा प्रमुख अष्टपैलू खेळाडू फलंदाजीत दमदार कामगिरी करतो हे सुखावणारे आहे, असेही विराट म्हणाला.