मुंबई -चेन्नई सुपर किंग्जने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा ६९ धावांनी धुव्वा उडवत गुणतालिकेत अव्वलस्थान काबीज केले. चेन्नईने विजयासाठी दिलेल्या १९२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना बंगळुरूचा संघ २० षटकात ९ बाद १२२ धावा करू शकला. रविंद्र जडेजाने ४ षटकात १३ धावा देत सर्वाधिक ३ गडी बाद केले. फलंदाजीत जडेजाने २८ चेंडूत ४ चौकार आणि ५ षटकारांसह नाबाद ६२ धावांची खेळी केली.
चेन्नईने विजयासाठी दिलेल्या १९२ धावांचा पाठलाग करणाऱ्या बंगळुरू संघाची सुरूवात चांगली झाली. विराट-पडीक्कल जोडीने ३.१ षटकात ४४ धावा फलकावर लावल्या. तेव्हा सॅम कुरेनने बंगळुरूला पहिला धक्का दिला. त्याने विराट कोहलीला ८ धावांवर धोनीकडे झेल देण्यास भाग पाडले. यानंतर पडीक्कल ठाकूरचा शिकार ठरला. त्याने १५ चेंडूत ४ चौकार आणि २ षटकारांसह ३४ धावा केल्या.
रविंद्र जडेजाने सुंदर (७), ग्लेन मॅक्सवेल (२२) आणि डिव्हिलियर्स (४) यांना बाद करत बंगळुरूची झुंज मोडून काढली. डॅनियल ख्रिश्चियन जडेजाच्या थेट फेकीवर धावबाद झाला. अखेरीस बंगळुरूचा संघ कसाबसा १२२ धावापर्यंत पोहोचला चेन्नईकडून जडेजाने सर्वाधिक ३ गडी बाद केले. तर इम्रान ताहीरने २, सॅम कुरेन, आणि शार्दुल ठाकूर यांनी प्रत्येकी १-१ गडी बाद केला.
तत्पूर्वी, चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तेव्हा ऋतुराज गायकवाड आणि फाफ डू प्लेसिस जोडीने चेन्नईला आश्वासक सुरूवात दिली. दोघांनी पहिल्या गड्यासाठी ९.१ षटकात ७४ धावांची सलामी दिली. युझवेंद्र चहलने गायकवाडला बाद करत ही जोडी फोडली. गायकवाडने २५ चेंडूत ४ चौकार आणि १ षटकारासह ३३ धावा केल्या. त्याचा झेल जेमिसनने टिपला.