नवी दिल्ली - आयपीएलच्या चौदाव्या हंगामावर सध्या कोरोनाचे सावट गडद होत चालले आहे. कोलकाता नाईट रायडर्स संघातील २ खेळाडूंना कोरोनाची लागण झाली आणि त्यामुळे त्यांचा आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध होणारा सामना तात्काळ स्थगित करण्यात आला. आता चेन्नई सुपर किंग्जच्या संघातही कोरोनाचा शिरकाव झाल्याचे समोर आले आहे. चेन्नईच्या तीन सदस्यांना कोरोनाची लागण झाली आहे.
एका इंग्रजी क्रीडा संकेत स्थळाने दिलेल्या वृत्तानुसार, चेन्नईचे मुख्य कार्यकारी अधिकारी काशी विश्वनाथ, गोलंदाजी प्रशिक्षक लक्ष्मीपती बालाजी आणि बसचा क्लीनर यांना कोरोनाची लागण झाली आहे. या तिघांव्यतिरिक्त संघातील खेळाडूंचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. या सर्वांची शेवटची चाचणी रविवारी घेण्यात आली होती. या चाचणीचा अहवाल आता समोर आला आहे.
रविवारी काशी विश्वनाथ, बालाजी आणि बसचा क्लीनर यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर आज (सोमवार) पुन्हा त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. यात देखील ते पुन्हा पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे ते संघाच्या बायो-बबलमधून बाहेर पडले आहे. पुढील १० दिवसांसाठी ते क्वारंटाइन झाले आहेत. दोन निगेटिव्ह चाचण्या येईपर्यंत त्यांना संघात प्रवेश मिळणार नाही.