मुंबई -आयपीएलच्या चौदाव्या हंगामातील १२ वा सामना तीन वेळचा चॅम्पियन चेन्नई सुपर किंग्ज आणि पहिल्या हंगामाचा विजेता राजस्थान रॉयल्स यांच्यात होणार आहे. धोनीच्या संघाने मागील सामन्यात पंजाब किंग्जचा सहज पराभव केला होता. तर दुसरीकडे राजस्थान रॉयल्सने अटातटीच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सची झुंज मोडून काढली होती. आता उभय संघ विजयी अभियान कायम ठेवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करताना दिसतील.
चेन्नई सुपर किंग्जचा सलामीच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सकडून पराभव सहन करावा लागला. त्यानंतर त्यांनी झोकात पुनरागमन करत पंजाब किंग्जवर विजय मिळवला. या सामन्यात मध्यमगती गोलंदाज दीपक चहरने चार गडी बाद केले. अशाच कामगिरीची आपेक्षा चेन्नई संघ आजच्या सामन्यात करत आहेत. याशिवाय सॅम कुरेन, ड्वेन ब्रोव्हो, रविंद्र जडेजा आणि मोईन अली यांनी देखील पंजाबविरुद्धच्या विजयात मोलाची भूमिका निभावली होती. यांच्याकडून देखील चेन्नई अशाच कामगिरीची आस लावून आहे. पण, अद्याप शार्दुल ठाकूरला लय मिळालेली नाही. ही बाब चेन्नईसाठी डोकेदुखी ठरत आहे. चेन्नईच्या पलंदाजीची मदार फाफ डू प्लेसिस, सुरेश रैना, अंबाती रायुडू यांच्यावर आहे. सलामीवीर ऋतुराज गायकवाडला अद्याप सूर गवसलेला नाही. तसेच धोनीच्या खेळीकडे देखील विशेष लक्ष असणार आहे.
दुसरीकडे राजस्थान रॉयल्ससाठी गोलंदाजी डोकेदुखी ठरत आहे. कारण त्याचा स्टार वेगवान गोलंदाज जोफ्रा ऑर्चर संघात सामिल नाही. पण, मागील सामन्यात जयदेव उनाडकट आणि चेतन सकारिया या जोडीने प्रभावी मारा केला आहे. ही राजस्थानसाठी सुखद बाब आहे. ख्रिस मॉरिस, मुस्तफिजूर रहमान यांना अद्याप टिच्चून मारा करता आलेला नाही. पण त्यांच्याकडे दांडगा अनुभव आहे. रियाग पराग आणि राहुल तेवतिया हे पाचव्या गोलंदाजाची भूमिका पार पाडत आहेत. आज चेन्नईच्या फलंदाजाना रोखण्याचे आव्हान या गोलंदाजांसमोर असणार आहे. फलंदाजीत कर्णधार संजू सॅमसन फॉर्मात आहे. पण त्याच्या खेळीत सातत्य नाही. डेव्हिड मिलरने मागील सामन्यात अर्धशतक झळकावत सूर गवसल्याचे संकेत दिले आहेत. जोस बटलर, मनन वोहरा, रियान पराग, राहुल तेवतिया यांच्या बॅटमधून अद्याप धावा निघाल्या नाहीत. त्यामुळे आजच्या सामन्यात राजस्थानच्या फलंदाजांना आपली जबाबदारी ओळखून खेळ करावा लागणार आहे.
चेन्नई सुपर किंग्ज स्क्वॉड -