मुंबई -ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स पाठोपाठ आता ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज ब्रेट ली याने देखील भारताला कोरोनाविरुद्धच्या लढ्यासाठी मदत दिली आहे. त्याने जवळपास ४२ लाख रूपयांची मदत देऊ केली आहे. ही माहिती त्याने सोशल मीडियावरून माहिती दिली. भारतात ऑक्सिजनचा तुडवडा निर्माण झाला आहे. यामुळे शेकडो रुग्णांना आपला जीव गमवावा लागत आहे. शासन शक्य ती उपाययोजना करत आहे. यात ब्रेट लीने आर्थिक योगदान दिले.
ली याने सोशल मीडियावर एक पोस्ट लिहली आहे. यात त्याने, 'भारत हे माझ्यासाठी दुसरे घरच आहे. माझ्या क्रिकेट कारकिर्दीत आणि निवृत्तीनंतर येथील लोकांकडून मिळालेल्या प्रेमाचे माझ्या हृदयात वेगळे स्थान आहे. या संकट काळात लोकांना मरताना पाहून मनाला वेदना होत आहेत. त्यांच्या मदतीसाठी मला थोडासा हातभार लावण्याची संधी मिळत आहे, हे मी माझे भाग्य समजतो. मी एक बिटकॉईन (जवळपास ४२ लाख) क्रिपटो रिलीफला दान करत आहे. यातून भारतातील विविध हॉस्पिटल्समध्ये ऑक्सिजनचा पुरवठा केला जाईल.'
हा काळ एकजूट होऊन संकटाशी मुकाबला करण्याचा आहे. यात गरजूंना शक्य तेवढी मदत करणे गरजेचे आहे. मी सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांचे आभार मानतो. ते या कठिण काळात अविरत काम करत आहेत. तसेच मी लोकांना विनंती करतो की, ते घरीच राहा, सुरक्षित राहा आणि वारंवार हात धुवा. गरज असेल तेव्हाच मास्क घालून घराबाहेर पडा आणि सोशल डिसन्सिंगचे पालन करा. पॅट कमिन्सचेही कौतुक, असेही ब्रेट लीने त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.