मुंबई - आयपीएल २०२१ मध्ये शनिवारी चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील सामना पार पडला. रोमहर्षक ठरलेल्या या सामन्यात मुंबईने अखेरच्या चेंडूवर विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाचा माजी फिरकीपटू ब्रॅड हॉजने या सामन्यासंदर्भात एक ट्विट करत मुंबई इंडियन्सचा अखिलाडू वृत्तीवर प्रश्न चिन्ह उपस्थित केले आहे.
दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर रंगलेल्या सामन्यात पोलार्डच्या धमाकेदार खेळीच्या जोरावर मुंबईने चेन्नई सुपर किंग्जला मात दिली. या सामन्यात शेवटच्या चेंडूवर दोन धावांची गरज असताना पोलार्डने दुहेरी धाव काढत मुंबईच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. हॉजने या सामन्यातील शेवटच्या क्षणाचा एक फोटो शेअर केला आहे. यात एनिगिडी चेंडूत फेकत असताना धवल कुलकर्णी चेंडू रिलीज होण्यापूर्वीच धाव काढण्यासाठी पळताना दिसत आहे.
दरम्यान, यापूर्वी अनेकांनी नॉन स्ट्राईकरला असलेल्या खेळाडूकडून होणाऱ्या या कृत्यावर आक्षेप नोंदवला होता. ब्रॅड हॉजने मुंबई इंडियन्सच्या खेळाडूचे हे कृत्य अखिलाडू वृत्तीचे आहे, असे म्हटलं आहे. चेन्नई विरुद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्सने चिटिंग करुन सामना जिंकला, अशा प्रतिक्रिया उमटताना दिसत आहे.
पोलार्डने किल्ला लढवला...
चेन्नई सुपर किंग्जने पहिल्यांदा फलंदाजी करताना २१८ धावा करुन मुंबईसमोर २१९ धावांचे लक्ष्य ठेवले होते. फाफ ड्युप्लेसीस आणि मोईन अलीच्या अर्धशतकी खेळीनंतर अंबाती रायुडूने चेन्नईकडून फटकेबाजी केली. या धावांचा पाठलाग करताना क्विंटन डी कॉक आणि रोहित शर्माने चांगली सुरुवात करुन दिली. या जोडीने पहिल्या विकेटसाठी ७१ धावांची भागिदारी केली. ही जोडी परतल्यानंतर मुंबईच्या डावाला गळती लागली. तेव्हा केरॉन पोलार्डने अखेरपर्यंत किल्ला लढवत मुंबईला विजय मिळवून दिला.
अखेरच्या षटकातील थरार...
मुंबईला अखेरच्या षटकात १६ धावांची गरज होती. पोलार्ड स्ट्राईकवर होता. एनिगिडीने टाकलेल्या पहिल्या चेंडूवर पोलार्डने चेंडू टोलावला. पण त्याने सिंगल घेणे टाळले. याच कारण दुसऱ्या बाजूला धवल कुलकर्णी नुकताच मैदानात आला होता. दुसऱ्या आणि तिसऱ्या चेंडूवर खणखणीत चौकार लगावत पोलार्डने सामना ३ चेंडूत ८ धावा अशा परिस्थितीत आणला. एनिगिडीने चौथा चेंडू पुन्हा निर्धाव टाकला. २ चेंडूत ८ धावांची गरज असताना पाचव्या चेंडूवर पोलार्डने षटकार खेचला. एका चेंडूत दोन धावांची गरज असताना पोलार्डने धवल कुलकर्णीच्या साथीने दोन धावा पळून काढल्या आणि संघाला विजय मिळवून दिला.